अधिकाऱ्याकडून बायणातील रहिवाशांना दुरुत्तरे : पाणी पुरवठा कार्यालयाकडे कामगार नसल्याचा दावा
वास्को : बायणातील कांदेलिरिया हायस्कूल परिसरातील रहिवाशांना गेला महिना-दीड महिना पाण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. या भागातील नळांना पाणी का येत नाही, हे शोधण्यासाठी बायणातील पाणी पुरवठा विभागाकडे कामगारच नाही. तुम्ही कामगार द्या, आम्ही कारण शोधतो, असा सल्ला तेथील एका अधिकाऱ्याने दिला. सदर प्रश्न जर निकालात काढला नाही तर कार्यालयावर मोर्चा नेण्याचा इशारा काही रहिवाशांनी व्यक्त केला आहे.
कांदेलारिया हायस्कूल जवळच्या ओम डेविन इमारत व आसपासच्या भागात गेल्या काही दिवसांपासून नळांना पाणीच येत नाही. काहीच्या नळांना कमी दाबाने पाणी येते, त्यामुळे एक बादली भरण्यास बराच अवधी लागतो. नळांना पाणी येत नसल्याने इमारतीतील रहिवाशांना पाण्याचा टँकर आणावा लागतो. गेल्या महिन्याभरात प्रत्येक दिवशी पाण्याचा टँकर आणावा लागल्याने आर्थिक भार वाढला आहे. इमारतीतील रहिवाशी निदान पाण्याचा टँकर तरी आणू शकतात. परंतु काही ठिकाणी पाण्याचा टँकर पोहचू शकत नाही. त्यामुळे त्यांना पाण्यासाठी मोठी धावपळ करावी लागते. यासंबंधी पाणी पुरवठा कार्यालयाला निवेदने देण्यात आली आहेत. तथापी काहीच फायदा झाला नाही.
याप्रकरणी स्थानिक नगरसेवक नारायण (दिलीप) बोरकर यांच्यासमोर सदर पाण्याची समस्या मांडल्यावर त्यांनी काही रहिवाशांसह पाणी पुरवठा कार्यालयातील अभियंत्याची भेट घेतली. त्यांच्यासमोर सदर प्रश्न मांडण्यात आला तेव्हा कदाचित जलवाहिनी कोठेतरी तुंबली असेल किंवा फुटली असेल, त्यामुळे पाणी पुढे येत नाही अशी शक्यता व्यक्त करण्यात आली. तथापी त्यासंबंधी शोध घेण्यासाठी आमच्याकडे कामगारांची कमतरता आहे. तुम्ही कामगारांची सोय करता तर आम्ही शोध घेण्यास तयार असल्याचे त्या अभियंत्याने सांगितले. पाणी भरपूर प्रमाणात आहे, परंतु नळांना पाणी का येत नाही याचा शोध घेण्याचे कष्ट संबंधित अधिकारी घेत नसल्याचे दिसत आहे.
पाणी समस्या ‘जैसे थे’
एक दिवसासाठी आम्ही कामगारांचा खर्च करू शकतो. त्यापेक्षा अधिक दिवस आम्हाला खर्च देण्यास परडवत नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे काहीच तोडगा निघाला नाही. सध्या संबंधित रहिवाशी पाण्यासाठी धावपळ करीत आहेत. तथापी त्यांची सहनशक्ती संपण्याची वाट पाणी पुरवठा कार्यालयाने पाहू नये, असाही इशारा देण्यात आला आहे.