आम्हाला तत्वज्ञान शिकवू नका; तुमच्या पक्षाचे बघा!

आपच्या अमित पालेकरांचा मनोज परब यांना सल्ला

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
16th March, 11:49 pm
आम्हाला तत्वज्ञान शिकवू नका; तुमच्या पक्षाचे बघा!

पणजी : रिव्हॉल्यूशनरी गोवन्सचे (आरजीपी) अध्यक्ष मनोज परब यांनी आम्हाला तत्त्वज्ञान शिकवण्यापेक्षा स्वत:च्या पक्षाकडे लक्ष द्यावे. सत्ताधारी भाजपविरोधात परब कधी आवाज उठवत नाहीत. त्यांना केवळ विरोधी पक्षच दिसतात. यातूनच त्यांची भूमिका स्पष्ट होते, असे प्रत्युत्तर आम आदमी पक्षाचे (आप) राज्य संयोजक अमित पालेकर यांनी रविवारी ‘गोवन वार्ता’शी बोलताना दिले​.
दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री तथा आमदार आतिषी यांनी नुकतेच गोव्यात येऊन राज्यातील पुढील निवडणुका आप स्बबळावर लढेल, अशी घोषणा केली. यावरून मनोज परब यांनी शनिवारी व्हिडिओ जारी करीत आप आणि काँग्रेसवर टीकास्र सोडले. या दोन्ही पक्षांच्या प्रदेशाध्यक्षांना आपापल्या पक्षांचे काहीही देणेघेणे नाही. त्यांना आमदार होऊन भाजपला पा​ठिंबा द्यायचा आहे. दोन्ही प्रदेशाध्यक्ष स्वार्थी आहेत, असा हल्लाबोल त्यांनी चढवला होता.
दरम्यान, यावर बोलताना अमित पालेकर यांनीही परब यांना सुनावले. मनोज परब यांना गेली अनेक महिने गोमंतकीय जनतेचे प्रश्न, समस्या दिसल्या नाहीत. ते कुंभकर्णाची झोप घेत होते. सरकारचे चुकीचे निर्णय, ध्येयधोरणे याबाबत आवाज उठवून जनतेला न्याय मिळवून देण्याचे सोडून परब वारंवार केवळ विरोधी पक्षांवर आरोपबाजी करीत आहेत. यातूनच त्यांची भूमिका काय आहे, हे जनतेच्या लक्षात आलेले आहे, असेही त्यांनी नमूद केले.
चाळीसही मतदारसंघांत पक्षांना बळकट करणार!
काँग्रेस, आप, गोवा फॉरवर्ड आणि इतर विरोधी पक्ष लोकांच्या प्रश्नांबाबत संघटितपणेच लढतील. निवडणुका हा वेगळा विषय आहे. पुढील निवडणुकांमध्ये युती करायची की नाही, त्याचा निर्णय दोन्ही पक्षांचे केंद्रीय नेते ठरवतील. सद्यस्थितीत दोन्हीही पक्षांनी चाळीसही मतदारसंघांत पक्षाला बळकट करण्याचा निर्णय घेतला आहे. भविष्यात युतीने जायचे ठरले, तर लोकसभेप्रमाणेच त्याचा फायदा आगामी निवडणुकांत दोन्ही पक्षांना होईल, असेही अमित पालेकर यांनी स्पष्ट केले.                    

हेही वाचा