हॅप्पीनेस इंडेक्स वाढण्यासाठी प्रयत्न : पर्यटनवाढीसाठी गोवा स्वच्छ राखण्याची गरज
मडगाव येथील शिमगोत्सव मिरवणुकीत सहभागी एक पथक.
मडगाव : राज्यात शिमगोत्सव, दिंडी व कार्निव्हल सारख्या कार्यक्रमाच्या आयोजनातून राज्य सरकार सांस्कृतिक पर्यटनवाढीसाठी प्रयत्नशील आहे. यातून राज्याचा हॅप्पीनेस इंडेक्स वाढत असून राज्यातील पर्यटनात वाढ होण्यासाठी गोवा स्वच्छ व सुंदर राखण्याची गरज आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
पर्यटन खाते व मडगाव पालिका यांच्या संयुक्त विद्यमाने मडगावात होली स्पिरिट चर्चपासून मडगाव पालिका चौकापर्यंत शिमगोत्सव मिरवणूक काढण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, पर्यटन मंत्री रोहन खंवटे, मडगाव शिमगोत्सव समितीचे अध्यक्ष दिगंबर कामत, भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, आमदार उल्हास तुयेकर, नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर, माजी आमदार बाबू कवळेकर यांच्यासह नगरसेवक सहभागी झाले होते. दुपारी मडगाव शिमगोत्सव समितीच्या कार्यालयातून मिरवणूक काढत देव दामोदराच्या चरणी प्रार्थना केल्यानंतर व्यासपीठानजीक देव दामोदराच्या प्रतिमेचे पूजन झाले. त्यानंतर व्यासपीठानजीक लहान मुलांच्या वेशभूषा स्पर्धांना सुरुवात करण्यात आली. रोमटामेळ कलापथक व चित्ररथ मिरवणुकीसाठी लोकांची गर्दी झालेली होती. यात १४७ महिलांचा सहभाग असलेल्या व सुमारे ४०० मुलांचा सहभाग असलेल्या पथकांनी रोमटामेळ सादर केला.
या कार्यक्रमावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले की, राज्यात शिमगोत्सवाची सुरुवात मोठ्या दिमाखात झालेली आहे. फोड्यानंतर आता मडगावात मिरवणूक काढली जात आहेत. शिमगोत्सवाची मिरवणूक पाहण्यासाठी हजारो लोक येत असतात. घोडेमोडणी, रोमटामेळ अशातून गोव्याची कला व संस्कृती विसरलेली नाही तर ती पुढे नेण्यात येत असल्याचे दिसते. सरकारच्यावतीने पर्यटन खात्यातर्फे संस्कृती जपण्याचे काम केले जात आहे. सांस्कृतिक पर्यटनासाठी गोवा स्वच्छ सुंदर ठेवण्याची गरज आहे. बक्षीस मिळेल किंवा नाही याकडे लक्ष न देता सहभागी होण्याची गरज आहे.
शिमगोत्सव मिरवणुकीत प्रत्येक गावातील वेगवेगळी कला, चालरिती, परंपरा व संस्कृती दिसून येते. राज्यात पेडणेपासून काणकोणपर्यंत पारंपरिक शिमगोत्सव वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. तरीही शिमगोत्सवासाठी आपण सर्वजण गोमंतकीय म्हणून एकत्र येतो. यातूनच आनंदीपणा वाढत असून गोव्यात हॅप्पीनेस इंडेक्स वाढण्यासाठी राज्य सरकार काम करत अाहे. - डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री