बांबोळीत कारच्या धडकेने वृद्ध पादचाऱ्याचा मृत्यू

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
7 hours ago
बांबोळीत कारच्या धडकेने वृद्ध पादचाऱ्याचा मृत्यू

पणजी : बांबोळी येथील होली क्राॅस चर्चजवळ इनोव्हा गाडीने धडक दिल्यामुळे पादचारी फ्रान्सिको राॅड्रिग्ज (७८, धर्मापूर - सासष्टी) यांचा इस्पितळात पोहचण्यापूर्वी मृत्यू झाला. या प्रकरणी आगशी पोलिसांनी इनोव्हा चालक आत्माराम रेडकर (२६, सिंधुदुर्ग) याच्याविरोधात गुन्हा दाखल करून कारवाई केली.

आगशी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवार, १५ रोजी सकाळी ७.०५ वाजता बांबोळी येथील होली क्राॅसजवळ बांबोळीहून आगशीच्या दिशेने जाणाऱ्या इनोव्हा गाडीने रस्ता ओलांडणाऱ्या एका पादचाऱ्याला धडक दिल्याची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाकडून आगशी पोलिसांना मिळाली. त्यानुसार, आगशीचे पोलीस निरीक्षक अनंत गावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक उपनिरीक्षक प्रशांत नाईक व इतर पोलीस पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. अपघाताची माहिती मिळताच १०८ रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली. त्यावेळी गंभीर जखमी झालेल्या फ्रान्सिको राॅड्रिग्ज (७८, धर्मापूर - सासष्टी) याला बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात नेण्यात आले. त्यावेळी राॅड्रिग्ज यांचा वाटेतच मृत्यू झाल्याचे तेथील डॉक्टरांनी घोषित केले.

आगशी पोलीस स्थानकाचे सहाय्यक उपनिरीक्षक प्रशांत नाईक यांनी अपघात प्रकरणी इनोव्हा गाडीचा चालक आत्माराम रेडकर याच्या विरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम २८१ आणि १०६(I) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. चालक रेडकर याला अटक करण्यात आली. रविवारी सायंकाळी त्याची जामिनावर सुटका करण्यात आली. 

हेही वाचा