वास्को : सडा खून प्रकरण : मल्लिकार्जुन घिवारीला ५ दिवसांची पोलीस कोठडी

वास्को प्रथमवर्ग न्यायालयाचा आदेश. क्षुल्लक कारणावरून घेतला होता आपल्या मोठ्या भावाचा बळी

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
5 hours ago
वास्को : सडा खून प्रकरण : मल्लिकार्जुन घिवारीला ५ दिवसांची पोलीस कोठडी

पणजी : दुचाकीवरून झालेल्या क्षुल्लक वादातून धाकट्या भावाने मोठ्या भावावर चाकूने वार करून त्याचा खून केल्याची घटना सडा येथील गोवा पुनर्वसन मंडळाच्या वसाहतीमध्ये गुरुवारी घडली होती. याप्रकरणी मुरगाव पोलिसांनी आरोपी मल्लिकार्जुन बसवराज घिवारी (४५) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. त्याला वास्को प्रथमवर्ग न्यायालयात हजार केले असता, ५ दिवसांची पोलिस कोठडी ठोठावण्यात आली. 

काय आहे प्रकरण ? 

जीआरबी कॉलनीमध्ये राहणारे घिवारी कुटुंबातील श्रीकांत ( ५०) व मल्लिकार्जुन (४५) या भावांमध्ये गुरुवारी रात्री साडेदहाच्या दरम्यान वाद निर्माण झाला. आपली दुचाकी न सांगता घेऊन गेल्याबद्दल मल्लिकार्जुन याने श्रीकांतला जाब विचारला. वाद वाढतच गेला. अचानक संतापलेल्या मल्लिकार्जुन याने चाकूने श्रीकांत याच्यावर वार केले. या भांडणामुळे वसाहतीतील नागरिक जमले आणि त्यांनी तत्काळ मुरगाव पोलिसांना घटनेची माहिती दिली.

जखमी श्रीकांतला तातडीने चिखली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक धीरज देवीदास यांच्या नेतृत्वाखाली, पोलिस उपअधीक्षक गुरुदास कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.    


हेही वाचा