साप्ताहिकी- या आठवड्यात घडलेल्या ठळक घडामोडी

मंत्रिमंडळातील फेरबदल, लाला की बस्ती चर्चेत

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
15th March, 11:58 pm
साप्ताहिकी- या आठवड्यात घडलेल्या ठळक घडामोडी

पणजी : मंत्रिमंडळातील फेरबदल, भाडेकरू पडताळणी मोहीम राबवून भाडेकरुंवर केलेली कारवाई, न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे ‘लाला की बस्ती’ पाडण्यात येणार, अशा घटनांनी हा आठवडा गाजला. उन्हाळा तीव्र होत असतानाच अनेक ठिकाणी आग लागून नुकसान झाले. या आठवड्यातील घडामोडींचा घेतलेला हा आढावा.

रविवार

बेकायदा मांस वाहतुकीप्रकरणी दवर्लीतील एकास अटक

दिल्लीतून गोव्यात खोट्या कागदपत्रांच्या आधारे मांसाची वाहतूक केली जात होती. कोकण रेल्वे पोलिसांकडून १.५४ लाख किमतीचे ५१४.५ किलो मांस जप्त करण्यात आले. तसेच संशयित फयाझ अहमद केनगेवार (३७, दवर्ली) याला अटक करण्यात आली.

सोमवार


कामुर्लीत घराला आग लागून २ लाखांचे नुकसान

मायना पाटो, कामुर्ली येथील व्हिली डिकुन्हा यांच्या घराला आग लागून २ लाखांचे नुकसान झाले. म्हापसा अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच आग नियंत्रणात आणल्याने मोठी दुर्घटना टळली. सुक्या गवताला लागलेली आग पसरून घराला लागली. घराच्या मागील बाजूला मोकळ्या जागी असलेल्या सुक्या गवताला कुणीतरी आग लावली होती. उष्णतेमुळे ही आग भडकली व पसरून घराला लागली. यात कौलारू घरातील स्वयंपाकघराची खोली व दुसर्‍या एका खोलीचे नुकसान झाले. स्वयंपाकघरातील फ्रीज, ओव्हन, इतर घरगुती वस्तू व छप्पर जळाले.


भाडेकरू पडताळणी मोहीम

उत्तर गोव्यातील विविध पोलीस स्थानकांतील पोलिसांनी आपापल्या हद्दीत जात भाडेकरू पडताळणी मोहीम उघडली आहे. या अनुषंगाने मोपा, कोलवाळ, म्हापसा, साळगाव पोलिसांनी मोपा येथील प्रभाग, थिवी रेल्वे स्थानक परिसर, म्हापसा बस स्थानक तसेच साळगाव येथील काही प्रभागांत भाडेकरूंच्या टेनंट फॉर्मची तपासणी केली. टेनंट फॉर्म भरून जमा न केलेल्या भाडेकरूंवर कारवाई करण्यात येत आहे.

मंगळवार

कॅन्सर, किडनीसह दुर्धर आजारांवर होणार संशोधन

कॅन्सर, किडनी, डायबेटीस तसेच इतर दुर्धर आजारांबाबत (एनसीडी) अभ्यास व संशोधनासंबंधीच्या लाँजीट्युडीनल कोहोर्ट स्टडी उपक्रमाचा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते शुभारंभ झाला. कॅन्सर, किडनी, डायबेटीस या आजारांचे प्रमाण, त्याची कारणे याबाबतही माहिती अभ्यासानंतर उपलब्ध होणार आहे.

आगोंद येथील १२ शॅक्सना टाळे

आगोंद किनाऱ्यावर असलेल्या १२ शॅक्सना टाळे ठोकण्यात आले. या शॅक्सनी प्रदूषण नियंत्रण मंडळाचा दाखला घेतला नव्हता. उच्च न्यायालयाने प्रदूषण नियंत्रण मंडळाचा परवाना घेतला नसताना व्यवसाय करत असल्याचा ठपका ठेवून सर्व शॅक्सना टाळे ठोकण्याचे आदेश दिले होते.

बुधवार


प्राथमिक शिक्षणासंबंधी राज्याचे माध्यम धोरण स्पष्ट : मुख्यमंत्री

प्राथमिक शिक्षणासंबंधी राज्याचे माध्यम धोरण स्पष्ट आहे. या धोरणाची कार्यवाही सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. प्राथमिक शिक्षणाच्या माध्यमाबाबत आमदार मायकल लोबोंनी केलेल्या मागणीवर मुख्यमंत्र्यांनी सदर प्रतिक्रिया दिली आहे.

दक्षिण गोव्यात हाऊझीची क्रेझ, लाखोंची बक्षिसे अन् हजारोंची गर्दी

दक्षिण गोव्यात सध्या अनेक स्पर्धांच्या ठिकाणी हाऊझी खेळ खेळला जातो. स्पर्धांच्या मधल्या वेळात अंक जाहीर केले जातात व स्पर्धा संपल्यावर फुल्ल हाउझीचे क्रमांक जाहीर केले जात असल्याने स्पर्धांसाठी प्रेक्षकांची गर्दी होत असल्याचे दिसून येते. दक्षिण गोव्यात म्युझिकल शो, फुटबॉलच्या स्पर्धा, कराओके स्पर्धा अशा कार्यक्रमांतील हाऊझीची क्रेझ वाढलेली आहे.


लाला की बस्तीमधील बेकायदा घरे हटविणार

रमझान असो किंवा रामनवमी असो, न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे ‘लाला की बस्ती’ मधील बेकायदा घेर हटविण्याच्या आदेशाची कार्यवाही होणार आहे. कोमुनिदाद प्रशासक आवश्यक त्या यंत्रणांच्या मदतीने ‘लाला की बस्ती’ मधील घरे हटविण्याची कार्यवाही करेल, असे मच्छिमार खात्याचे मंत्री नीळकंठ हळर्णकर यांनी स्पष्ट केले आहे. 

गुरुवार

गोव्यात अती महत्त्वाच्या खनिज शोधासाठी पुढाकार घ्यावा : मुख्यमंत्री

गोव्यात एक ते दोन अति महत्त्वाची खनिजे असण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारच्या नवीन धोरणानुसार खासगी कंपन्यांनी गोव्यातील अती महत्त्वाच्या खनिज शोधासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.

१७(२) वरील न्यायालयाच्या बंधनामुळे पेच

नगरनियोजन कायद्याच्या कलम १७(२) वरील उच्च न्यायालयाच्या आदेशाला सरकार सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार आहे. वकील मुकुल रोहतगी हे सर्वोच्च न्यायालयात राज्य सरकारची बाजू मांडणार आहेत. कलम १७(२) रद्द झाले नसून न्यायालयाच्या आदेशानुसार या नियमांमध्ये दुरुस्ती केली जाईल, असे नगरनियोजन मंत्री विश्वजीत राणे यांनी सांगितले. 

शुक्रवार

मंत्रिमंडळ फेरबदल १५ दिवसांत!

मंत्रिमंडळ फेरबदलाच्या विषयाला पुढील १५ दिवसांत पूर्णविराम लागेल. नीलेश काब्राल, दिगंबर कामत, संकल्प आमोणकर, डिलायला लोबो, मायकल लोबो या नावांचा विचार होऊ शकतो, असे सभापती रमेश तवडकर यांनी सांगितले.

दुचाकीच्या वादातून धाकट्या भावाकडून मोठ्या भावाचा खून

न सांगताच दुचाकी घेऊन गेल्याचा क्षुल्लक राग मनात ठेवत धाकट्या भावाने आपल्या मोठ्या भावाचा चाकूने वार करत खून केल्याची घटना सडा-वास्को येथे घडली. याप्रकरणी मुरगाव पोलिसांनी धाकटा भाऊ मल्लिकार्जुन घिवारी ( ४५) याच्याविरोधात गुन्हा नोंद करून अटक केली. घिवारी कुटुंबातील श्रीकांत (५०) व मल्लिकार्जुन (४५) या भावांमध्ये वाद निर्माण झाला. आपली दुचाकी न सांगता घेऊन गेल्याबद्दल मल्लिकार्जुन याने श्रीकांतला जाब विचारला. वाद वाढतच गेला. अचानक संतापलेल्या मल्लिकार्जुन याने चाकूने श्रीकांत याच्यावर वार केले, यातच श्रीकांतचा मृत्यू झाला.

राज्यात धुळवड उत्साहात

राज्यभरात शुक्रवारी धुळवड मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या धुळवडीत राजकारणी, युवावर्ग आणि वृद्ध देखील मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. गावासह शहरी भागात विविध ठिकाणी आयोजित केलेल्या धुळवडीच्या कार्यक्रमात राजकारणी, उद्योजकांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून रंग खेळण्याचा आनंद लुटला.

शनिवार

मामलेदार मृत्यू प्रकरण : न्यायालयाने फेटाळला संशयिताचा जामीन

बेळगाव येथील प्रथमवर्ग न्यायालयाने फोंडाचे माजी आमदार लवू मामलेदार यांच्या मृत्यू प्रकरणी पोलिसांच्या अटकेत असलेल्या संशयित आमीरसोहेल शकिलसाब सनदी याचा जामीन अर्ज फेटाळला. गुह्याचे गांभीर्य आणि प्रकरणाचे स्वरूप पाहता न्यायालयाने सदर निर्णय दिला.

प्रदेश भाजपकडून मंडळ कमिट्यांची स्थापना

प्रदेश भाजपकडून मंडळ कमिट्यांची स्थापना सुरू. मुरगावचे अ‍ामदार संकल्प आमोणकर यांच्या उपस्थितीत अॅड. अविनाश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली पुढील ३ वर्षांसाठी मुरगाव कमिटी स्थापन करण्यात आली.

लक्षवेधी :-

➤ पुढील दोन महिन्यांत राज्यातील सर्वच पंचायती ऑनलाईन होणार आहेत. गोवा इलेक्ट्रॉनिक लिमिटेडकडून (जीइएल) यासंदर्भातील काम सुरू असून, ते अंतिम टप्प्यात पोहोचल्याची माहिती पंचायत संचालक सिद्धी हळर्णकर यांनी दिली.

➤ शैक्षणिक वर्ष १ एप्रिलपासून सुरू करण्याच्या निर्णयाला काही पालकांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. न्यायालयाने शिक्षण संचालनालय, केंद्रीय शिक्षण मंत्रालय यांना नोटिसा जारी केल्या असून सुनावणी १९ मार्च रोजी होणार आहे.

➤ स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत पणजी स्मार्ट सिटी लिमिटेडला एकूण ५१ प्रकल्प मंजूर झाले आहेत. यासाठी केंद्राने १,०५१ कोटी रुपये मंजूर केले आहेत. ४ मार्च २०२५ पर्यंत ५१ पैकी ४२ प्रकल्प पूर्ण झाले आहेत. पूर्ण झालेल्या प्रकल्पांचा खर्च ८४९ कोटी रुपये इतका होता. 

हेही वाचा