हिंदी पाठ

नवे शैक्षणिक धोरण अंमलात येत आहे. त्यात अशा संस्कारांचा समावेश आहे. सृजनशील चिंतक व तज्ञ अशा माध्यमांचा व त्यातील नव्या तंत्राचा कसा वापर करू शकतात याचा विचार करुन अनेक शक्यता, आराखडे तयार करू शकतात.

Story: ये आकाशवाणी है |
5 hours ago
हिंदी पाठ

आकाशवाणीच्या पणजी केंद्रावरून हिंदी पाठ प्रसारित होत असे. कित्येक वर्षे हे प्रसारण चाललं होतं. मला ते आवडायचे. मी अधूनमधून ऐकत असे. हिंदीची जाण वाढत असे. खास करून एक शिक्षक वा शिक्षिका आणि दोन मुलं (विद्यार्थी, विद्यार्थिनी) सहभागी होत असत. साधारण पंधरा मिनिटांचा हा कार्यक्रम असे. 

शिक्षकांची व मुलांची तयारी आहे हे समजे. तालमीशिवाय चागलं देता येत नाही. मुलं चुकायची. शिक्षक त्यांची दुरूस्ती करत असत. 

“मैंने चेष्टा की हे वाक्य तू विराज, कोंकणीत सांग पाहू...” शिक्षिका विचारत असे. 

तो उत्तर देत असे, “टीचर हांवें फकाणां वा मस्करी केली.” 

टीचर त्याची दुरूस्ती करत असे. “विराज, चेष्टा यानेकी प्रयत्न हिंदी में. मराठीत चेष्टा म्हणजे मस्करी. पिंकी तू सांग, काही असे शब्द ज्या शब्दांना मराठीत वेगळा व हिंदीत वेगळा अर्थ आहे.” 

पिंकी सांगायची – “शिक्षा म्हणजे मराठीत सजा, हिंदीत शिक्षण. साक्षात्कार म्हणजे मराठीत ईश्वराचे दर्शन व हिंदीत मुलाखत.” 

“विराज, तू वाक्यात उपयोग करून सांग साक्षात्कार शब्दाचा.” 

विराज सांगायचा, “अभी आप रेडिओपर सुनेंगे जानेमाने शतरंज खिलाडी अनुराग म्हामल का साक्षात्कार.” 

शिक्षिका हा हिंदी पाठ हिंदीत तसंच कोंकणीत शिकवायची. कुणालाही ऐकायला हा पाठ आनंददायी, ज्ञानवर्धक असे. 

माझी हिंदीची गोडी, समज या हिंदी पाठामुळे वाढली. काही शब्द हिंदीत वेगळे, कोंकणीत वेगळे आणि मराठीत वेगळ्या अर्थाचे असतात हे समजायला लागलं. हिंदी अभ्यासाला वळण लागलं. एकूणच हा हिंदी पाठ आनंददायी होता. कारण त्याचं सादरीकरण. त्याला एक नाट्यमय कलात्मक रंग होता. तो अजूनही आठवणीत होता. शिक्षणाचं ते एक सशक्त माध्यम होय. 

त्यानंतर मी अनेक हिंदी शब्दकोश वगैरे आणले. काही वर्षांअगोदर दिल्लीहून ‘नालंदी हिंदी शब्दकोश’ हा दीड लाख शब्दांचा शब्दसागर आणला. तो इथं टेबलावरच आहे. फार सुंदर. मी १९७९ मध्ये गोवा बोर्डात हिंदी विषयात प्रथम आलो त्याचं श्रेयही या सर्व संस्कारांना जातं. आपली आवड गोडी वाढवण्यासाठी त्याला खतपाणी घालणारे वातावरण सभोवताली हवे.

मध्यंतरीच्या कोविड काळात सगळं ठप्प झालं. हळूहळू शिक्षण ऑनलाईन सुरू झालं. त्या वेळी मला हिंदी पाठासारख्या दर्जेदार रेडिओ कार्यक्रमांची आठवण झाली. अनेक विषयांचे पाठ श्राव्य किंवा दृक-श्राव्य माध्यमातून आजही दिले जाऊ शकतात. गणित धरून. कारण गणित हा माझा स्पेशलायझेशनचा विषय आहे. गणित विषयावर मी तोंडी क्वीज स्पर्धाही अखिल गोवा पातळीवर आयोजित केली आहे. हिंदी पाठाचा आदर्श घेऊन गणित वा इतर विषय यशस्वीपणे, समर्थपणे शिकवणं शक्य आहे. इच्छा पाहिजे. 

अनेक ठिकाणी, अनेक राज्यात शिक्षकांना अभिनयाचे प्राथमिक धडे दिले जातात. वर्गात मुलांचं लक्ष कसं खेचून घ्यावे हे शिकवतात. हालचाली, डोळ्यांच अभिनय हे शिकवतात. हिंदी पाठातील शिक्षक मला कायम असं प्रशिक्षण घेतल्यासारखे वाटले. त्यांचा आवाज गोड असायचा. नाट्यमयता प्रभावी असायची. हा पाठ दर दिवशी संध्याकाळी प्रसारित होत असे.

नवे शैक्षणिक धोरण अंमलात येत आहे. त्यात अशा संस्कारांचा समावेश आहे. सृजनशील चिंतक व तज्ञ अशा माध्यमांचा व त्यातील नव्या तंत्राचा कसा वापर करू शकतात याचा विचार करुन अनेक शक्यता, आराखडे तयार करू शकतात. ते व्हायला हवं.


मुकेश थळी 
(लेखक साहित्य अकादेमी पुरस्कार प्राप्त साहित्यिक, अनुवादक, कोशकार असून आकाशवाणीचे निवृत्त वृत्तनिवेदक आहेत.)