सायबर फसवणूक आणि गोवा

आपल्या एका चुकीच्या क्लिकमुळे आपली आयुष्यभराची कमाई क्षणार्धात गायब होऊ शकते याचे भान असले पाहिजे. सायबर विश्वात निष्काळजीपणा, लोभ होत्याचे नव्हते करू शकतात.

Story: कॉलिंग अटेंशन |
6 hours ago
सायबर फसवणूक आणि गोवा

गेल्या काही वर्षात देशासह गोव्यात सायबर गुन्ह्यात वाढ होत आहे. सायबर गुन्हेगार वेगवेगळ्या पद्धतीने लोकांना फसवत आहेत. पोलिसांनी एक मोडस ओपरेंडी म्हणजेच गुन्हे करण्याची पद्धत शोधून काढत असतानाच हे गुन्हेगार दुसरी पद्धत शोधून काढत आहेत. केंद्र सरकारतर्फे सायबर फसवणुकीबाबत जागृती मोठ्या प्रमाणावर केली जात आहे. याबाबत तक्रार करण्यासाठी विशेष हेल्पलाइन तसेच पोर्टल सुरू करण्यात आले आहे. गेल्या काही महिन्यात राज्य सरकारने देखील जागृती सुरू केली आहे. गोवा पोलिसांच्या सायबर विभागाने कोट्यावधी रुपयांची फसवणूक असणारी अनेक प्रकरणे शोधून आरोपींना अटक केली आहे. असे असले तरी दिवसेंदिवस सायबर गुन्हेगारीची आणि त्याद्वारे होणाऱ्या फसवणुकीची व्याप्ती वाढतच चाललेली दिसते.

सध्या सुरू असलेल्या संसदेच्या अधिवेशनात राज्यसभेत सादर केलेल्या माहितीनुसार सायबर फसवणुकीची तक्रार दाखल करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या पोर्टलवर साधारणपणे ४ वर्षात संपूर्ण देशातून ३८.२२ लाख तक्रारी नोंद झाल्या आहेत. यातून तब्बल ३६ हजार कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे तक्रारदारांनी नमूद केले आहे. 

पोलिसांना संशयित सायबर भामट्यांच्या बँक खात्यांतील ४३८० कोटी रुपयांची रक्कम गोठवण्यात यश आले आहे. तरी देखील आतापर्यंत तक्रारदारांना केवळ ६०.५१ कोटी रुपये परत करण्यात आले आहेत. पैसे परत मिळण्याची टक्केवारी केवळ ०.१६ इतकी कमी आहे. ही आकडेवारी नक्कीच विचार करायला लावणारी आहे. ही आकडेवारी त्या पोर्टलवर तक्रार दाखल केलेल्यांची आहे. याशिवाय तक्रार न केलेल्या लोकांची संख्या ही अधिक असण्याची शक्यता आहे.

सायबर फसवणूक किंवा गुन्ह्यांची गोव्यातील परिस्थिती वेगळी नाही. गेल्या काही वर्षात गोव्यात सायबर गुन्ह्यांद्वारे दिवसाला लाखो रुपयांची फसवणूक होत आहे. कधी कधी ही रक्कम वाढून दिवसाला कोट्यवधी रुपयांपर्यंत पोहोचत आहे. राज्यसभेतील माहितीनुसार केंद्र सरकारच्या सायबर फसवणुकीच्या तक्रार पोर्टलवर फेब्रुवारी २०२५ अखेरीस ६०५२ तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत. यातून तब्बल १४९.०६ कोटी रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार करण्यात आली आहे.

गोव्यातून आलेल्या तक्रारींवर कारवाई करताना पोलिसांना संशयितांच्या बँक खात्यांतील १३.७५ कोटी रुपयांची रक्कम गोठवण्यात यश आले आहे. असे असले तरी आतापर्यंत तक्रारदारांना केवळ ९.३८ लाख रुपये परत करण्यात यश आले आहे. रक्कम परत मिळण्याची टक्केवारी ०.०६ इतकी कमी आहे. 

सायबर भामटे बनावट व्हॉट्सअॅप किंवा अन्य सोशल मीडिया प्रोफाईल काढून लुबाडणे, फोन करून ओटीपी किंवा बँक खात्याची अन्य माहिती मागणे, डिजिटल अरेस्ट, डिजिटल अरेस्ट, हनी ट्रॅपिंग, नोकरी किंवा लग्नाचे आमिष दाखवून फसवणे, बनावट युपीआय आयडी बनवणे, खोटे गुंतवणूक अॅप, लॉटरी स्कॅम, ऑनलाइन ट्रांजॅक्शन घोटाळा, मोठा आर्थिक परताव्याचे आमिष दाखवणे, ईमेल पाठवून कोट्यवधी डॉलरची लॉटरी लागल्याची बतावणी करणे अशा एक ना अनेक प्रकारे लोकांची आर्थिक फसवणूक करत आहेत. याशिवाय सेक्सटॉर्शन, सायबर बुलीईंग, मोर्फ छायाचित्रे, व्हिडीओ करून खंडणी उकळणे, एखाद्या व्यक्तीवर सायबर पाळत ठेवणे असे गुन्हे देखील सायबर विश्वात घडत आहेत. सायबर फसवणूक रोखण्यासाठी गृह खात्यातर्फे विशेष प्रयत्न सुरू करण्यात आले आहे. आता सामान्य जनतेने देखील जागरूक राहणे आवश्यक आहे.

तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे आज आपल्याला मोबाईलच्या एका क्लिकवर संपूर्ण जगाचे ज्ञान मिळू शकते. तंत्रज्ञानाचे जसे फायदे आहेत तसे तोटेही आहेत. आपल्याला निवड करण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत. मात्र निवड कशाची करायची हे आपल्या हातात आहे. मोबाईल, इंटरनेटचा वापर करून आपण आपले ज्ञान समृद्ध करून घेणार की तासानतास स्क्रोल करत रील बघत बसणार हे आपल्या हातात आहे. काही प्रमाणात सायबर फसवणुकीचे देखील असेच आहे. यापासून वाचण्यासाठी जागृत राहणे आवश्यक आहे. आपल्या एका चुकीच्या क्लिकमुळे आपली आयुष्यभराची कमाई क्षणार्धात गायब होऊ शकते याचे भान असले पाहिजे. सायबर विश्वात निष्काळजीपणा, लोभ होत्याचे नव्हते करू शकतात.  

तेव्हा अनोळखी फोन, एसएमएस, लिंक, व्हिडिओ कॉलला उत्तर देण्यापूर्वी हे खरेच गरजेचे आहे का? याचा विचार करावा.


पिनाक कल्लोळी
(लेखक गोवन वार्ताचे प्रतिनिधी आहेत.)