साखळीवासीयांसमवेत होळीच्या रंगात रंगले मुख्यमंत्री

रवींद्र भवनतर्फे धुळवड : आबालवृद्धांनीही लुटली रंगांची मजा

Story: वार्ताहर। गोवन वार्ता |
20 hours ago
साखळीवासीयांसमवेत होळीच्या रंगात रंगले मुख्यमंत्रीसाखळी : साखळी रवींद्र भवनतर्फे रवींद्र भवनच्या पार्किंग जागेत साखळीतील क्लब व संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या होळीच्या दिवशी धुळवड या उत्सवात समस्त साखळीवासीयांबरोबर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व महिला नेत्या सुलक्षणा सावंत यांनीही धमाल मजा केली. 

साखळीवासीयांबरोबर होळीच्या रंगात खेळताना एकमेकांना रंग लावत तसेच रंग हवेत उडवत मुख्यमंत्री व मिसेस मुख्यमंत्र्यांनी मोठा जल्लोष केला. 

समस्त गोमंतकियांना यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी होळीच्या शुभेच्छा व्यक्त करताना एकमेकांना रंग लावत असताना आपले डोळे, नाक व आरोग्याची काळजी घ्यावी, असा संदेश दिला.
 
साखळी रवींद्र भवनतर्फे यावर्षी अनेक वर्षांच्या खंडानंतर पुन्हा धुळवडीचा सोहळा आयोजित केला होता. या सोहळ्यात साखळीतील विविध समाजसेवी संस्था, क्रीडा क्लब व इतरांचाही सहभाग करून घेतला होता. 

सकाळी रवींद्र भवनच्या पार्किंग जागेत खास उभारण्यात आलेल्या रंगमंच व मंडपात रेनडान्स तसेच लहान मुलांसाठी भव्य असा मोठ्या आकाराचा कृत्रिम स्विमिंग पूल तयार करण्यात आला होता. यामध्ये लहान मुलांनी धमाल मजा केली. तसेच रेनडान्स मध्ये आकर्षक संगीतावर तरुणांचा नृत्य आविष्कार पाहायला मिळाला.
 
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व सुलक्षणा सावंत यांनी या धुळवडीमध्ये उपस्थिती लावताच सर्वांनी त्यांना रंग लावावा आणि होळीच्या शुभेच्छा दिल्या. त्याचप्रमाणे मुख्यमंत्र्यांनीही स्वतः सर्वांना रंग लावत शुभेच्छा दिल्या. 

यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, 'होळी हा रंगाचा सण असून आपल्या आयुष्यात सकारात्मक रंगांची उधळण या सणापासून सुरू होत असते. या सणाला सदैव महत्त्व देत सकारात्मकपणे पुढे जात असताना आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. तसेच आपण लावत असलेल्या रंगातून इतरांना परिणाम होऊ नये, याचीही काळजी घ्यावी.'
 
यावेळी मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी स्विमिंग पूल मध्ये मौजमजा करत असलेल्या लहान मुलांबरोबरही मजा लुटली. तसेच या धुळवडीत स्थानिक लहान मोठ्या व्यावसायिकांनी विविध प्रकल्पाची दालने थाटली होती. या सर्व दालनांना मुख्यमंत्र्यांनी भेट देऊन माहिती घेतली.

कार्यक्रमाच्या आयोजनाचा उद्देश सफल
होळी व त्यानंतर येणारी धुळवड हा मोठा उत्सव असून सर्व साखळीवासीयांनी एकत्रित येऊन भव्य अशा जागेत या उत्सवाची मजा एकत्रितपणे लुटावी व एकमेकांमधील संबंध अधिक दृढ व्हावे, हा या कार्यक्रमा मागचा हेतू होता. तो या कार्यक्रमाला लाभलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे आयोजनाचा उद्देश सफल झाल्याचे रवींद्र भवनचे उपाध्यक्ष दत्ताराम चिमुलकर यांनी म्हटले.      
हेही वाचा