आफ्रिका : काँगोमध्ये बोट उलटली; तब्बल २५ जणांना जलसमाधी, ३० जणांना वाचवण्यात यश

मृतांमध्ये अनेक फुटबॉलपटूंचा समावेश. नदीपरिवहन नियमांची पायामल्ली केल्यानेच ही दुर्घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
3 hours ago
आफ्रिका : काँगोमध्ये बोट उलटली; तब्बल २५ जणांना जलसमाधी, ३० जणांना वाचवण्यात यश

किंशासा : नैऋत्य काँगोमध्ये बोट उलटून २५ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये अनेक फुटबॉल खेळाडूंचा समावेश होता. अधिकाऱ्यांनी सोमवारी ही माहिती दिली. रविवारी रात्री माई-न्डोम्बे प्रांतातील मुशी शहरात एका सामन्यावरून हे खेळाडू परतत असताना क्वा नदीत त्यांना घेऊन जाणारी बोट उलटली.  रात्रीच्या वेळी कमी दृश्यमानता हे अपघाताचे कारण असू शकते. मुशी क्षेत्राचे स्थानिक प्रशासक रेनेकल क्वातिबा यांनी अशी माहिती दिली. दरम्यान तातडीने बचाव मोहीम राबवत किमान ३० जणांना वाचवण्यात आले. 

मध्य आफ्रिकी काँगो देशात जीवघेणे बोट अपघात गेल्या काही वर्षांत अगदी सामान्य झाले आहेत. दरम्यान येथे नदी परिवहन  नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी अधिकाऱ्यांना नेहमीच संघर्ष करावा लागतो. येथे रात्री उशिरापर्यंत  बोटीतून प्रवास केला जातो. प्रवाशांची ओव्हरलोडिंग झाल्यामुळेच अनेकदा अशा घटना घडतात. 

दुसरीकडे, गेल्या आठवड्यात रवांडा समर्थित एम२३ बंडखोरांनी पूर्व काँगोमधील एका प्रमुख शहरातील दोन रुग्णालयांमधून किमान १३० आजारी आणि जखमी लोकांचे अपहरण केले. २८ फेब्रुवारी रोजी, एम२३ च्या बंडखोरांनी गोमा येथील सीबीसीए न्दोशो हॉस्पिटल आणि हील आफ्रिका हॉस्पिटलवर हल्ला केला.

हे एक मोक्याचे शहर आहे. वर्षाच्या सुरुवातीला बंडखोरांनी ते ताब्यात घेतले होते. बंडखोरांनी सीबीसीएमधील ११६ रुग्णांचे आणि हील आफ्रिका येथील हॉस्पिटलच्या १५ रुग्णांचे अपहरण केले.  हे सर्वजण काँगोली सैन्याचे सैनिक आहेत किंवा सरकार समर्थक वझालांडो मिलिशियाचे सदस्य आहेत असा गैरसमज झाल्याने त्यांनी हे कृत्य केले होते. 

हेही वाचा