नेपाळमध्ये हिंदू राष्ट्राची मागणी, पूर्वाश्रमीच्या राजाला देशात वाढते समर्थन

राजेशाही पुन्हा लागू करा : स्थानिकांची मागणी

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
11th March, 12:19 pm
नेपाळमध्ये हिंदू राष्ट्राची मागणी, पूर्वाश्रमीच्या राजाला देशात वाढते समर्थन

काठमांडू  : नेपाळची राजधानी काठमांडूमध्ये पुन्हा एकदा हिंदू राष्ट्र घोषित करण्याची मागणी तीव्र होऊ लागली आहे. त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर नेपाळचे माजी राजे ज्ञानेंद्र शाह यांच्या स्वागतासाठी मोठी गर्दी झाली. या जमावाने देशात पुन्हा राजेशाही लागू करण्याची मागणी करत पूर्वाश्रमीच्या राजाचे स्वागत केले आहे.

उत्तर प्रदेशच्या सीमेला लागून असलेल्या नेपाळचे राजकारण आता बदलताना दिसत आहे. चीन समर्थक माओवादी चळवळीने २००६ मध्ये राजा ज्ञानेंद्र यांची राजवट संपवली, असे मानून नेपाळमध्ये डाव्या विचारसरणीचे राज्य सुरू झाले होते. मात्र आता पुन्हा एकदा, येथे राजेशाही परतण्याची चाहूल लागत आहे.

पूर्वाश्रमीचे राजे ज्ञानेंद्र शाह हे नेपाळचे पर्यटनस्थळ पोखरा येथील २ महिन्यांच्या वास्तव्यानंतर काठमांडूत परतले आहेत. ज्ञानेंद्र शाह हे देशाच्या राजकारणात परतू इच्छित असल्याची चर्चा नेपाळमध्ये सुरू आहे. 

याकरता ते मोठी तयारी करत असल्याचे मानले जात आहे. पोखरा प्रवासादरम्यान ज्ञानेंद्र शाह यांनी अनेक मंदिरे अन् तीर्थस्थळांचे दौरे केले आणि जनतेचा कल जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे.

महत्त्वाचे म्हणजे, माजी राजे ज्ञानेंद्र शाह जानेवारी महिन्यात उत्तर प्रदेश दौऱ्यावर होते. माध्यमांतील वृत्तांनुसार, तेव्हा त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचीही भेट घेतली होती. 

योगींचा फोटो वापरल्याने आक्षेप

दरम्यान रविवारी, योगी आदित्यनाथ, माजी राजे ज्ञानेंद्र यांचे फोटो आणि राष्ट्रध्वज घेऊन तरुणांनी मोटारसायकलवरून रॅली काढली होती. मात्र आता, पंतप्रधान केपी ओली यांनी रॅली दरम्यान योगींचा फोटो वापरल्यावरून आक्षेप घेतला आहे.

हेही वाचा