बेळगाव : येथील प्रथमवर्ग न्यायालयाने फोंडाचे माजी आमदार लवू मामलेदार यांच्या मृत्यू प्रकरणी पोलिसांच्या अटकेत असलेल्या संशयित आमीरसोहेल शकिलसाब सनदी याचा जामीन अर्ज फेटाळला. गुह्याचे गांभीर्य आणि प्रकरणाचे स्वरूप पाहता न्यायालयाने सदर निर्णय दिला. दरम्यान हाती आलेल्या माहितीनुसार, पुढील सुनावणी ही पोलिसांनी आरोपपत्र दाखल केल्यानंतरच होईल. यासाठी वेळ लागेल.
काय आहे प्रकरण ?
खासगी कामानिमित्त बेळगाव येथे गेलेले लवू मामलेदार खडेबाजार-बेळगाव येथील शिवानंद लॉजमध्ये वास्तव्यास होते. शनिवारी १५ फेब्रुवारी रोजी दुपारच्या सुमारास प्रवास करत असताना त्यांच्या कारचा धक्का समोरच्या रिक्षाला बसला. त्यात रिक्षाचे मोठेसे नुकसान झाले नव्हते. त्यामुळे मामलेदार यांनी माफी मागत लॉजचा रस्ता धरला. पण, संबंधित रिक्षाचालकाने मात्र त्यांचा पाठलाग सुरू केला.
मामलेदार शिवानंद लॉजच्या पार्किंग परिसरात कार पार्क करत असताना रिक्षाचालकाने तेथे पोहोचून मामलेदार यांच्याशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. त्यातून हे प्रकरण हातघाईवर आले. यात संशयित अमिरसुहेल सनदी याने लवू मामलेदार यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. लॉज मालकासह इतर काहीजणांकडून सनदीला अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण, तरीही त्याने मारहाण सुरूच ठेवली.
या प्रकारानंतर स्वतःला सावरत मामलेदार लॉजचा जिना चढून आपल्या खोलीत जाण्यासाठी निघाले असतानाच ते कोसळले. त्यानंतर लॉज व्यवस्थापनाने उपचारासाठी त्यांना तत्काळ इस्पितळात दाखल केले. परंतु, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणाची माहिती मिळताच खडेबाजार पोलिसांनी तपासचक्रे गतिमान केली.
लवू मामलेदार यांना मारहाण करत त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या आमीरसोहेल शकिलसाब सनदी याला ताब्यात त्याच्या विरुद्ध बेळगाव मार्केट परिसरात भारतीय न्याय संहिता कलम १०३(१), १२६(२), १५२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. येथून त्याची हिंडलगा येथील मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली. नंतर त्याला १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.