राय ग्रामसभेत भरवस्तीतील मोबाईल टॉवरला विरोध

बेतकीतळे, बागभाट तळे वेटलँटऐवजी हेरिटेज करण्याच्या सूचना

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
6 hours ago
राय ग्रामसभेत भरवस्तीतील मोबाईल टॉवरला विरोध

राय येथील ग्रामसभेला उपस्थित ग्रामस्थ.

मडगाव : राय येथील ग्रामसभा रविवारी झाली असून यात मोबाईल टॉवरची वस्ती असलेल्या व शाळेच्या परिसरात उभारणी करण्यास विरोध दर्शवण्यात आला. याशिवाय गावातील दोन तळी वेटलँट म्हणून जाहीर करण्यात येणार होती. पण, त्यालाही नागरिकांनी विरोध दर्शवला.
राय पंचायतीच्या हॉलमध्ये रविवारी झालेल्या ग्रामसभेवेळी पंचायतीचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला असता ग्रामस्थांच्या सूचनांनुसार त्यात बदल करून त्यानंतर पुढील ग्रामसभेत सादर करण्यात यावा. याशिवाय हा अर्थसंकल्प पंचायत सदस्यांच्या बैठकीतही चर्चेला आलेला नसल्याचे सांगण्यात आल्यावर ग्रामसभेत संमती मिळाल्यावर पंचायत मंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात येईल, असे सांगण्यात आले.
मनोरा राय येथे उभारण्यात येणार्‍या मोबाईल टॅावरला लोकांनी विरोध दर्शवला आहे. शाळेच्या परिसरात व ज्याठिकाणी लोकवस्ती जास्त आहे, अशा रहदारीच्या परिसरात मोबाईल टॉवरची उभारणी केली जाऊ नये, अशी मागणी करण्यात आली. त्यानुसार लोकांनी दुसरीकडे जागा उपलब्ध करून देण्याचीही तयारी दर्शवलेली आहे. लोकांचा टॉवरला विरोध नसून ज्याठिकाणी टॉवरची उभारणी करण्यात येत आहे, त्याला विरोध दर्शवण्यात आल्याचेही स्पष्ट करण्यात आले. त्यानुसार पंचायतीकडून संबंधितांना तशा सूचना करण्याचा निर्णय घेण्यात आला.
राय गावातील बेतकीतळे व बागभाट तळे या दोन तळ्यांना वेटलँड करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारचा आहे. त्याला स्थानिकांचा विरोध असून मंत्री सिक्वेरा व आमदार रेजिनाल्ड यांनीही लोकांची बाजू घेतली आहे. त्यामुळे त्या जागा वेटलँड न करता हेरिटेज जागा करण्यात याव्यात, असे सांगण्यात आले. तसेच गावात लोकांना त्रास होणारे चुकीच्या पद्धतीने घातलेले गतिरोधक काढून टाकण्याची मागणीही करण्यात आली.
ओला कचरा उचलण्याची मागणी
ग्रामसभेत कचर्‍याच्या प्रश्नावर चर्चा झाली असता सध्या सुका कचर्‍याची उचल केली जात असून ओला कचराही उचलण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली. पंचायत सदस्यांनी काकोडा येथील कचरा प्रकल्पाच्या ठिकाणी भेट दिली होती. यावेळी पंचायत क्षेत्रातील कचराही त्यांनी घ्यावा, अशी विनंती करण्यात आली होती, त्यांनी ते मान्य केले असून कचरा उचल करण्यासाठी ठेकेदार उपलब्ध करून देण्याचेही सांगण्यात आले आहे. तसेच काकोडाप्रमाणेच चांगला प्रकल्प सासष्टीत व्हावा, अशी मागणीही केली आहे.        

हेही वाचा