राय परिसरातील ३.५ कोटींचे काम सुरु : वाहिन्या टाकण्यासाठी वेगळी सोय करणार
मडगाव : राय येथील परिसरातील रस्त्यांच्या हॉटमिक्सिंगचे काम सुरु करण्यात आले आहे. यासाठी सुमारे ३.५ कोटींचा खर्च केला जाणार आहे. रायमध्ये भूमिगत वाहिन्यांचे काम होणे बाकी आहे. हॉटमिक्सिंग केलेले रस्त्यांचे पुन्हा खोदकाम करु देणार नाही, त्यासाठी पर्यायी व्यवस्था करावी. याबाबत सर्व खात्यांशी चर्चा केलेली आहे, अशी माहिती आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांनी दिली.
राय कुडतरी येथील हॉटमिक्सिंगच्या कामाची सुरुवात आमदार रेजिनाल्ड यांच्या उपस्थितीत झाली. यावेळी आमदार रेजिनाल्ड यांनी सांगितले की, कुडतरी मतदारसंघातील विविध भागातील रस्त्यांच्या हॉटमिक्सिंगचे काम हाती घेण्यात आलेले आहे. कोणत्याही प्रकारच्या राजकारणाशिवाय कुणी मतदान केले किंवा केले नाही ते न पाहता कुडतरी मतदारसंघासाठी काम केले जात आहे. राय परिसरात भूमिगत वाहिन्यांचे काम झालेले नाही, कुडतरी परिसरातील भूमिगत वाहिन्यांचे काम झालेले आहे. राय परिसरातील रस्त्याच्या हॉटमिक्सिंगचे काम करत असताना वाहिन्या टाकण्यासाठी खोदकाम करण्यासाठी बाजूला पर्यायी व्यवस्था करण्याच्या सूचना केलेल्या आहेत.
लोकांच्या पैशांतून रस्ते केले जात असल्याने हॉटमिक्सिंग केलेले रस्ते पुन्हा खोदण्यास देणार नाही. यापूर्वी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या पाणी विभाग, वीज खात्याच्या अधिकार्यांसह संबंधित सर्व विभागाच्या अधिकार्यांशी चर्चा केलेली आहे. याशिवाय ठेकेदाराला काम कमी झाले तरी चालेल पण गुणवत्तापूर्ण काम व्हावे, अशा सूचना केलेल्या आहेत. काम कमी झाले तर काहीजण टीका करतील पण झालेले रस्ते किमान दहा वर्षे टिकण्याची गरज आहे, असे स्पष्ट केले.
कुडतरी मतदारसंघात आतापर्यंत 50 ते 60 कोटींची रस्त्यांची कामे हाती घेतलेली असून त्यातील सुमारे दहा कोटींची कामे झालेली आहेत. राशोल परिसरातील हॉटमिक्सिंग करण्यात आलेले आहे. यापुढे कुडतरीतील, कामुर्ली, मनोरा राय येथील कामेही केली जातील. मात्र, दोन ते तीन मोठी कामे ही भूमिगत वीजवाहिन्यांची कामे व जलवाहिन्यांच्या कामांमुळे थांबलेली आहेत, असेही आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांनी सांगितले.
कचर्याचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न
कुडतरी मतदारसंघातील रस्त्यांशेजारी कचरा टाकण्यात येतो पंचायतीकडून तो उचलण्यात येतो पण लोक पुन्हा कचरा टाकतात. राज्याबाहेरुन आलेल्या व्यक्तींसह काही स्थानिकांकडूनही कचरा टाकण्याचे प्रकार होतात. पण सुका व ओल्या कचर्यासाठी व्यवस्थापन करण्याची गरज असून ती केली जाईल. हा कचरा गाई, म्हशी खातात व त्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो, त्यामुळे माणसांसह प्राण्यांच्या आरोग्याच्यादृष्टीने घातक असल्याने कचरा कुणीही रस्त्याशेजारी टाकू नये, असे आवाहन आमदार रेजिनाल्ड यांनी केले.