भराव घातलेली माती वाहून गेल्याने पुलानजीकच्या भागाला भगदाड
बेळगाव : बेळगाव-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील अनमोड घाटातील ब्रीज धोकादायक स्थितीत आहे. ब्रीजलगत काँक्रिटच्या खाली भरावासाठी असलेली मातीने भरलेली पोती निखळली असून काँक्रिट खचत आहे. यामुळे घाटातील हा ब्रीज धोकादायक स्थितीत आहे. विशेष म्हणजे या ब्रीजकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.
गेल्या सात वर्षांपासून या महामार्गाचे काम सुरु आहे. ते पूर्ण होण्यापूर्वीच या मार्गावर बांधलेले ब्रीज धोकादायक बनले आहेत. रामनगर ते अनमोड (गोवा सीमेपर्यंत) भागातील अनेक ब्रीजच्या बाजूच्या रस्त्यावरील काँक्रिट खचले आहे.
अशातच खनिज वाहतूक करणारी वाहने आणि वास्को ते दांडेली पर्यंत लाकडी चिप्सची वाहतूक करणारी वाहने याच मार्गाने जात असल्याने या महामार्गावर दुर्घटना घडण्याची शक्यता अधिक आहे.
अनमोड घाटात दोन्ही राज्यांच्या सीमेवर हा ब्रीज आहे. या ब्रीजच्या दोन्ही बाजूने मातीने भरलेल्या पोत्यांचा भराव घातला असून त्यावर काँक्रेटीकरण करण्यात आले आहे. मात्र भराव घातलेल्या मातीच्या पोत्यातील माती पावसामुळे वाहून गेल्याने महामार्गला भगदाड पडले आहे. त्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.