विर्डी, साखळी, सुर्लातील खाणींची केली पाहणी
पणजी : पर्यावरणाचे जतन करतानाच स्थानिकांचे हीत सांभाळून गोव्यासह संपूर्ण देशात खाण व्यवसाय सुरू करण्यास सरकारचे सर्वोच्च प्राधान्य आहे. खाण व्यवसायासाठी संतुलित पद्धतीचा अवलंब करतानाच स्थानिकांना उदरनिर्वाहाचे साधन उपलब्ध व्हावे यासाठी सरकार प्रयत्नरत असल्याचे केंद्रीय कोळसा व खाण मंत्री जी. किशन रेड्डी यांनी सांगितले.
केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी यानी गोवा भेटीत साखळी मतदारसंघातील विर्डी, साखळी व सुर्ला येथील खाणींची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासमवेत राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे व स्थानिक उपस्थित होते. विकासासह रोजगारनिर्मितीसाठी खाण व्यवसाय सुरू करण्याची गरज आहे. यासाठी केंद्र सरकारकडून राज्य सरकारला आवश्यक ते सहकार्य दिले जात असल्याचेही त्यानी सांगितले. राज्यात खाण ब्लॉकच्या लिलावाची प्रक्रिया सुरू आहे. यंदाच्याच हंगामात खाणी सुरू होणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनीही व्यक्त केला आहे.