तिसवाडी : मंत्र्याला लाच दिल्याचा माजी मंत्री मडकईकरांचा आरोप खोटा : अरूण सिंग

खोट्या आरोपाबाबत कारवाई करण्यावर चर्चा सुरू

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
13th March, 03:34 pm
तिसवाडी : मंत्र्याला लाच दिल्याचा माजी मंत्री मडकईकरांचा आरोप खोटा : अरूण सिंग

पणजी : सरकारमधील मंत्र्याला कामासाठी लाच दिल्याचा माजी मंत्री पांडुरंग मडकईकर यांचा आरोप खोटा आहे. त्यांच्या आरोपात कोणतेही तथ्य नाही. खोट्या आरोपाबाबत त्यांच्यावर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे, असे वक्तव्य भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा खासदार अरूण सिंग यांनी केले. 

भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस अरूण सिंग यांनी पणजीतील कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांच्या सोबत भाजप  प्रदेशाध्यक्ष दामू नाईक व राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे उपस्थित होते. गोवा भेटीवर असलेल्या अरूण सिंग यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले तसेच पक्षकार्याची स्थिती जाणून घेतली.

मागील आठवड्यात माजी मंत्री पांडुरंग मडकईकर यांनी एका कामासाठी मंत्र्याला १५ ते २० लाख रूपयांची लाच दिल्याचा आरोप केला होता. पक्षाचे राष्ट्रीय सचिव बी. एल. संतोष यांची भेट घेतल्यानंतर त्यानी हा आरोप केला होता. त्यांच्या जाहीर आरोपामुळे पक्षात व जनतेमध्ये खळबळ उडाली होती. पांडुरंग मडकईकर यांनी आरोप केल्याने त्यांनीच नावा सांगावे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केली होती. महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात, उद्योग मंत्री मॉविन गुदिन्हो, कृषी मंत्री रवी नाईक यांच्यासह इतर मंत्र्यांनी लाच दिलेल्या मंत्र्याचे नाव सांगण्याची मागणी केली होती. यानंतर आता पक्षाच्या केंद्रीय नेत्याने आरोप खोटे असल्याचे सांगून माजी मंत्री पांडुरंग मडकईकर यांच्यावर कारवाईचे संकेत दिले आहेत. यामुळे या प्रकरणाला आता वेगळीच कलाटणी मिळाली आहे.

हेही वाचा