अखिल गोवा टॅक्सी चालक संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
पणजी : पणजी स्मार्ट सिटीमध्ये टॅक्सी पार्किंगवर बंदी घालण्याचा निर्णय चुकीचा आहे. पणजीत आम्ही पर्यटकांना सोडण्यासाठी येतो. पर्यटक पुन्हा फिरून टॅक्सीसाठी येईपर्यंत आम्ही गाड्या कुठे पार्क करायच्या, असा प्रश्न करून पर्यटक येईपर्यंत आम्हाला टॅक्सी पार्क करण्यास द्यावी, त्या बदल्यात अाम्ही पार्किंग शुल्क भरण्यास तयार आहोत, अशी मागणी अखिल गोवा टॅक्सी चालक संघटनेने केली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी पणजी शहरात टॅक्सी पार्किंगवर बंदी घालणारी अधिसूचना जारी केल्यामुळे टॅक्सी चालक संघटनेने उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन सादर केले. यावेळी पत्रकारांशी बोलताना असोसिएशनचे अध्यक्ष शेख मुझफ्फर अहमद म्हणाले, सहाय्यक जिल्हाधिकाऱ्यांनी राजधानीत सार्वजनिक ठिकाणी टॅक्सी पार्क करण्यास बंदी घालणारी अधिसूचना जारी केली होती.
या अधिसूचनेत स्मार्ट सिटीचे काम सुरू असताना कार्निव्हल, शिमगोत्सवादरम्यान शहरात टॅक्सी आल्यास पार्किंगला जागा मिळत नाही आणि गर्दी होते. त्यामुळे टॅक्सी पार्किंगवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे, असे म्हटले होते. यावर अहमद यांनी पूर्वी अाम्ही सार्वजनिक पार्किंगमध्ये गाड्या पार्क करायचो आणि त्यांना योग्य पैसे द्यायचो. या सूचनेनंतर आम्हाला टॅक्सी पार्क करण्याची परवानगी दिलेली नाही. त्यासाठी शुल्कही घेतले जात नाही. पण, आरटीओ अडीच हजार रुपयांपर्यंत दंड आकारतो, अशी तक्रार अहमद यांनी केली. पणजीत येणारा प्रत्येक पर्यटक फोन्तेनास, मेरी इमॅक्युलेट चर्च, महालक्ष्मी मंदिर, कॅसिनो, मोठी हॉटेल्स येथे जेवणासाठी येतो. पणजीत ग्राहकांना सोडल्यानंतर आपण गाड्या कुठे पार्क करायच्या, असा सवालही यांनी उपस्थित केला.
जिल्हाधिकाऱ्यांचे तोडगा काढण्याचे आश्वासन
पणजीतील टॅक्सी पार्किंगची बंदी उठवून पुनर्विचार करावा, अशी मागणी करून आम्ही आमच्या समस्या जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे सादर केल्या असून त्यांनी यावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आहे. आमच्याकडे पुरेसे ग्राहक नाहीत, आम्हाला दर तीन दिवसांनी भाडे मिळते. अशावेळी पणजीत भाडे आणल्याबद्दल जर टॅक्सी चालकाला दीड-अडीच हजार रुपये दंड झाला तर तो काय कमावणार, असेही अहमद यांनी निवेदनात म्हटले आहे.