गोव्यातील महागाई राष्ट्रीय सरासरीपेक्षा अधिक

सलग दुसऱ्या महिन्यात किरकोळ महागाई दरात वाढ

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
5 hours ago
गोव्यातील महागाई राष्ट्रीय सरासरीपेक्षा अधिक

पणजी : चालू वर्षात सलग दुसऱ्या महिन्यात गोव्यातील ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित किरकोळ महागाई दर राष्ट्रीय सरासरी पेक्षा अधिक होता. फेब्रुवारीत देशभरात अन्न धान्य, भाजीपाला आदींच्या किमतीत किरकोळ घट झाली. यामुळे राष्ट्रीय महागाई दर ३.६१ टक्के इतका राहिला. हा मागील सात महिन्यांतील सर्वात कमी महागाई दर ठरला आहे. असे असले तरी फेब्रुवारीतील गोव्यातील महागाई दर हा मागील १३ महिन्यांतील सर्वाधिक म्हणजेच ४.७५ टक्के राहिला आहे.
याआधी जानेवारी २०२५ मध्ये महागाई दर ४.६९ टक्क्यांपर्यंत पोहोचला होता. तर ऑक्टोबर २०२४ मध्ये ४.६७ टक्के होता. मे २०२४ मध्ये महागाई दर सर्वात कमी म्हणजे १.४ टक्के होता. अहवालानुसार, जानेवारी २०२५च्या तुलनेत फेब्रुवारी २०२५ मध्ये अन्नधान्य, आरोग्य, वाहतूक, इंधन आदी क्षेत्रांतील कमी झालेल्या किमतीमुळे महागाई दर कमी झाला आहे. असे असले तरी गतवर्षीच्या फेब्रुवारीच्या तुलनेत फेब्रुवारी २०२५ मध्ये, सोने, चांदी, कांदा, नारळ आणि खोबरेल तेलाचे भाव वाढले आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) महागाई दराची कमाल मर्यादा ६ टक्के इतकी ठरवली आहे.
अहवालानुसार, तेलंगणानंतर महागाई दर कमी असण्यात आंध्र प्रदेश (२.४४ टक्के), सिक्कीम (२.६४ टक्के), गुजरात (२.९८ टक्के), राजस्थान (३.०२ टक्के), पश्चिम बंगाल (३.०६ टक्के), महाराष्ट्र (३.०६ टक्के), हिमाचल प्रदेश (३.२५ टक्के) अरुणाचल प्रदेश (३.४१ टक्के) यांचा क्रमांक लागतो. तर केरळ (७.३१ टक्के), मणिपूर (५.३५ टक्के), छत्तीसगढ (४.८९ टक्के) या राज्यांतील महागाई दर तुलनेने अधिक होता.
फेब्रुवारी २०२५मध्ये गोवा देशात चौथ्या स्थानी
फेब्रुवारी २०२५ मध्ये महागाई दर जास्त असण्याच्या यादीत गोवा देशात चौथ्या स्थानी राहिला. केंद्रीय सांख्यिकी आणि अंमलबजावणी खात्याने जारी केलेल्या अहवालानुसार फेब्रुवारीमध्ये तेलंगणा येथील महागाई दर सर्वात कमी म्हणजे १.३१ टक्के होता.