गुन्हे वार्ता : न सांगता दुचाकी घेऊन गेला, धाकट्या भावाने मोठ्या भावाचा खुनच केला

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
14th March, 03:39 pm
गुन्हे वार्ता : न सांगता दुचाकी घेऊन गेला, धाकट्या भावाने मोठ्या भावाचा खुनच केला

वास्को : सडा-वास्को येथे क्षुल्लक कारणावरून एकाचा खून करण्यात आला. न सांगताच दुचाकी घेऊन गेल्याचा क्षुल्लक राग मनात ठेवत धाकट्या भावाने आपल्या मोठ्या भावाचा चाकूने वार करत खून केला. सदर प्रकार सडा येथील गोवा पुनर्वसन मंडळाच्या वसाहतीमध्ये काल गुरुवारी  होळीच्या पूर्वसध्येला घडला.

याप्रकरणी मुरगाव पोलिसांनी पंचनामा करून घाकटा भाऊ मल्लिकार्जुन घिवारी ( ४५) याच्याविरोधात गुन्हा नोंद करून अटक केली.सडा येथे गोवा पुनर्वसन मंडळाच्या वसाहतीला येथे जीआरबी कॉलनी या नावाने ओळखले जाते. या कॉलनीमध्ये राहणारे घिवारी कुटुंबातील श्रीकांत ( ५०) व मल्लिकार्जुन (४५) या भावांमध्ये गुरुवारी रात्री साडेदहाच्या दरम्यान वाद निर्माण झाला. आपली दुचाकी न सांगता घेऊन गेल्याबद्दल मल्लिकार्जुन याने श्रीकांतला जाब विचारला. वाद वाढतच गेला. अचानक संतापलेल्या मल्लिकार्जुन याने चाकूने श्रीकांत याच्यावर वार केले.

त्यामुळे गंभीर जखमी झालेला श्रीकांत तेथेच निपचित पडून राहिला. दोघांच्या भांडणाच्या आवाजामुळे तेथे जमा झालेल्यांनी सदर घटनेची माहिती मुरगाव पोलिसांना दिली. दरम्यान गंभीर जखमी झालेल्या श्रीकांतला सावरत उपचारासाठी चिखली उपजिल्हा इस्पितळात नेण्यात आले. तथापी तेथे त्याला मृत घोषित करण्यात आले. पोलीस पुढील तपास करत आहेत. 


हेही वाचा