गुन्ह्याचे गांभीर्य पाहून दिला निर्णय
बेळगाव : फोंडा येथील माजी आमदार लवू सूर्याजी मामलेदार यांच्या धक्कादायक मृत्यू प्रकरणातील संशयित आरोपी अमीरसुहिल शकीलसाब सनदी याचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जामीन अर्ज शुक्रवारी जिल्हा न्यायाधीशांच्या न्यायालयात सुनावणीसाठी आला होता. न्यायालयात तो फेटाळण्यात आला.
खासगी कामानिमित्त बेळगाव येथे गेलेले माजी आमदार लवू मामलेदार खडेबाजार-बेळगाव येथील शिवानंद लॉजमध्ये वास्तव्यास होते. गेल्या शनिवारी दुपारच्या सुमारास प्रवास करत असताना त्यांच्या कारचा धक्का समोरच्या कॅबला बसला. त्यात कॅबचे मोठेसे नुकसान झाले नव्हते. त्यामुळे मामलेदार यांनी माफी मागत लॉजचा रस्ता धरला; पण कॅबचालक अमिरसुहेल सनदी याने त्यांचा पाठलाग करत मामलेदार यांना शिवानंद लॉजच्या पार्किंग परिसरात गाठले आणि त्यांच्याशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. त्यातून हे प्रकरण हातघाईवर आले. यात अमिरसुहेल सनदी याने लवू मामलेदार यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. लॉज मालकासह इतर काहीजणांकडून सनदीला अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला; पण तरीही त्याने मारहाण सुरूच ठेवली. या प्रकारानंतर स्वतःला सावरत मामलेदार लॉजचा जिना चढून आपल्या खोलीत जाण्यासाठी निघाले असतानाच ते कोसळले. त्यानंतर लॉज व्यवस्थापनाने उपचारासाठी त्यांना तत्काळ इस्पितळात दाखल केले; परंतु तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
जिल्हा रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी मामलेदार यांना मृत घोषित केले होते, तर हॉटेल कर्मचाऱ्यांनी आरोपीला पकडले. घटनेनंतर पोलिसांनी लगेचच त्याला अटक केली होती.
पोलीस न्यायालयात आरोपपत्र दाखल करेपर्यंत संशयित आरोपी हिंडलगा मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत राहील.
जामीन मिळाल्यास आरोपी फरार होण्याची शक्यता
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, आरोपीने माजी आमदारांवर सार्वजनिक ठिकाणी हल्ला करण्याचा गंभीर गुन्हा केल्यामुळे जामीन फेटाळण्यात आला. जामीन मिळाल्यास आरोपी फरार होण्याची शक्यता आहे. जामीन मिळाल्यास तो प्रत्यक्षदर्शींना आमिष दाखविण्याची किंवा धमकी देण्याची शक्यता आहे. यामुळे त्याचा जामीन फेटाळण्यात आला.