इव्हान्सियो क्वाद्रोस विरोधात आरोपपत्र दाखल

जीप कंपास गाड्यांसाठी आगाऊ रक्कम घेऊन ९४ लाखांचा गंडा

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
12 hours ago
इव्हान्सियो क्वाद्रोस विरोधात आरोपपत्र दाखल

पणजी : जीप कंपास गाड्यांसाठी आगाऊ रक्कम घेऊन ग्राहक व कंपनीला ९४ लाख रुपयांना गंडा घातल्याप्रकरणी पणजी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायदा २००२ अंतर्गत क्वाद्रोस मोटार प्रा. लिमिटेडचे मालक इव्हान्सियो क्वाद्रोस यांच्या विरोधात पणजी येथील उत्तर गोवा जिल्हा व सत्र न्यायालयात सुमारे ४ हजारहून जास्त पानी आरोपपत्र दाखल केले आहे.

या प्रकरणी पणजी पोलिसांनी २०१९ मध्ये गुन्हा दाखल केला होता. त्यानुसार, सांतिनेझ येथे इव्हान्सियो क्वाद्रोस याच्या दुकळे आर्केडमध्ये क्वाद्रोस मोटार प्रा. लिमिटेड कंपनी होती. या कंपनीला जीप कंपास गाड्यांसाठी वितरक म्हणून एफ. सी. ए. इंडिया ऑटोमोबाईलने परवानगी दिली होती. क्वाद्रोस मोटार प्रा. लिमिटेड कंपनीने ग्राहकाकडून जीप कंपास गाड्यांसाठी सुमारे ९३,९६,४७४ रुपये आगाऊ रक्कम घेतली होती. मात्र, ठरल्याप्रमाणे इव्हान्सियो क्वाद्रोस याने ग्राहकांना जीप कंपासचे वितरण केले नाही तसेच संबंधित रक्कम एफ. सी. ए. इंडिया ऑटोमोबाईल कंपनीत जमा केली नव्हती. त्यामुळे एफ. सी. ए. इंडिया ऑटोमोबाईल कंपनीने ग्राहक तसेच कंपनीची फसवणूक केल्याची तक्रार पणजी पोलीस स्थानकात दाखल केली होती. तक्रारीची दखल घेऊन पोलिसांनी क्वाद्रोस मोटार प्रा. लिमिटेड कंपनीसह मालक इव्हान्सियो क्वाद्रोस विरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम ४०६ व ४२० खाली गुन्हा नोंद केला. याच दरम्यान सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) वरील गुन्ह्याची दखल घेऊन कारवाई सुरू केली होती.

ईडीने पणजी येथील उत्तर गोवा जिल्हा व सत्र न्यायालयात सुमारे ४ हजारहून जास्त पानी आरोपपत्र दाखल केले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी ५ एप्रिल रोजी होणार आहे.

४४ लाखांची फसवणूक केल्याचे आरोपपत्र

संशयित इव्हान्सियो क्वाद्रोस याने काही ग्राहकांचे पैसे परत केल्याचे समोर आले. त्यानंतर या प्रकरणी ईडीने चौकशी करून इव्हान्सियो क्वाद्रोस आणि क्वाद्रोस मोटार प्रा. लिमिटेड कंपनी विरोधात सुमारे ४४ लाख रुपयांची फसवणूक केल्याचे आरोपपत्र दाखल केले.

हेही वाचा