बुटामध्ये लपवलेला चरस, फिल्टर पेपर केला होता जप्त
पणजी : कोलवाळ मध्यवर्ती कारागृहात ड्रग्जची तस्करी करताना सर्गी रोझनोव्ह या रशियन अंडर ट्रायल कैद्याला पकडण्यात आले होते. म्हापसा येथील प्रथमवर्ग न्यायालयाने संशयित रोझनोव्ह याला २५ हजार रुपये व इतर अटींवर सशर्त जामीन मंजूर केला आहे. याबाबतचा आदेश न्या. वैशाली लोटलीकर यांनी दिला.
कोलवाळ कारागृहाचे अधीक्षक शंकर गावकर यांनी कोलवाळ पोलिसांत तक्रार दिली. त्यानुसार, संशयित सर्गी रोझनोव्हला गोवा पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने (एएनसी) १४ डिसेंबर २०२३ रोजी मोरजी येथील खिंड गार्डन परिसरात अटक केली होती. त्यावेळी त्याच्याकडून १ कोटी ७५ हजार रुपये किमतीचा २ किलो उच्च दर्जाचा गांजा, १.२ किलो चरस आणि १५ ग्रॅम एलएसडी लिक्विड ड्रग्ज जप्त केले. या प्रकरणात रोझनोव्हला कोलवाळ कारागृहात ठेवण्यात आले होते. संशयिताला वरील प्रकरणात २१ जानेवारी २०२५ रोजी एस्कॉर्ट पोलीस न्यायालयात सुनावणीसाठी घेऊन गेले होते. न्यायालयात हजर केल्यानंतर सायंकाळी ३.४० च्या सुमारास कारागृहात परतताना रोझनोव्ह या कैद्याची कारागृहाच्या फाटकावरील फ्रिस्कींग पॉईंटमधील आयआरबी पोलिसांनी तपासणी केली होती. त्यावेळी संशयिताकडून बूटमध्ये लपवलेला ९४ हजारांचा काळ्या रंगाचा चरस आणि दोन पातळ फिल्टर पेपर जप्त करण्यात आले होते. या प्रकरणी कोलवाळ पोलिसांनी सर्गी रोझनोव्ह याच्या विरोधात गुन्हा दाखल केला. सर्गी रोझनोव्ह याच्यातर्फे अॅड. यश नाईक यांनी म्हापसा येथील प्रथमवर्ग न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला. या प्रकरणी न्यायालयात सुनावणी झाली असता, त्याच्या विरुद्ध लावण्यात आलेले सर्व आरोप खोटे आहेत. याशिवाय कायदेशीर प्रक्रियेचे पालन न करता त्याला अटक करण्यात आली आहे. तसेच त्याची सध्याची कस्टडी बेकायदेशीर आणि अनधिकृत असल्याचा दावा न्यायालयात केला. या प्रकरणी पोलिसांनी संशयिताचा जामीन अर्ज फेटाळण्यासाठी कोणतेही कारण दिले नाही, असे निरीक्षण नोंदवून न्यायालयाने संशयित सर्गी रोझनोव्ह याचा जामीन मंजूर केला.
गोव्याच्या बाहेर जाण्यास बंदी
सर्गी रोझनोव्ह याला २५ हजार रुपयांच्या हमीवर, न्यायालयाच्या परवानगीशिवाय गोवा किंवा देशाच्या बाहेर जाण्यास बंदी घातली आहे. याशिवाय तपास अधिकारी तसेच न्यायालयात सुनावणीसाठी हजर राहण्याच्या अटींवर सशर्त जामीन मंजूर केला आहे.