जुने गोवेतील व्यक्तीची फसवणूक; एकाला अटक
पणजी : शेअर बाजारात मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून जुने गोवे येथील एकास ३८ लाख रुपयांचा गंडा घालण्याचा प्रकार उघडकीस आला. याबाबत गोवा सायबर पोलिसांनी रुतिक अनिल निकम (२३, महाराष्ट्र) याला अटक केली. या प्रकरणात आणखी काही संशयित सहभागी असून याबाबत पोलीस निरीक्षक दीपक पेडणेकर अधिक तपास करत आहेत.
जुने गोवा येथील एका रहिवाशाला संशयित आरोपींनी फेयर्स ट्रेडिंग ॲपद्वारे शेअर बाजारात गुंतवणूक करण्यास सांगितले. त्यानंतर तक्रारदाराला वॉट्सॲपवरील ‘आर १ ग्रुप’ नावाच्या ग्रुपमध्ये ॲड केले. यानंतर त्यांनी तक्रारदाराला मोठ्या परताव्याचे खोटे आश्वासन दिले. त्यांनी तक्रारदाराला वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये ३८ लाख रुपये जमा करण्यास सांगत त्याला फसवले.
या प्रकरणाचा तपास करताना सायबर पोलिसांना महाराष्ट्रातील आरोपीच्या बँक खात्यात २ लाख रुपये जमा झाल्याचे समजले. गुरुवारी त्याचा शोध घेत अटक करण्यात आली. पुढील तपासात असे दिसून आले की, हे बँक खाते देशातील अन्य २२ सायबर आर्थिक फसवणुकीच्या तक्रारींशी संबंधित होते. ही रक्कम एकूण ११.५ कोटी रुपये इतकी आहे.
हा तपास सायबर क्राईमचे पोलीस अधीक्षक राहुल गुप्ता, उपअधीक्षक अक्षत आयुष यांच्या देखरेखीखाली पोलीस उपनिरीक्षक शेरविन डिकोस्टा, पोलीस कॉ. सचिन नाईक आणि महेश नाईक यांनी केला.
सावधगिरी बाळगण्याचे आवाहन
सायबर क्राईमचे प्रकार वाढत आहेत. यामुळे गोवा पोलिसांनी नागरिकांना ऑनलाईन गुंतवणूक करताना सावधगिरी बाळगण्याचे तसेच संशयास्पद हालचालींची तक्रार सायबर गुन्हे पोलीस स्थानकात देण्याचे आवाहन केले आहे.