पार्से येथील प्रकार : मांद्रे पोलिसांकडून दोन्ही संशयितांना अटक, दागिने जप्त
पेडणे : साधूच्या वेशात आलेल्या सोलापूर येथील दोघा भामट्यांनी महिलेला गंडा घालण्याचा प्रकार पार्से येथे घडला. या दोघांनी एका महिलेला धार्मिक विधी करण्यास सांगून तिच्याकडील साडेआठ लाखांचे दागिने घेऊन ते दोघे पसार झाले. मात्र, मांद्रे पोलिसांनी त्या दोघांना सोलापूर येथे जात अटक करुन त्यांच्याकडील सर्व दागिने जप्त करुन त्यांना अटक केली.
चोनसाई पार्से येथील अमिता अनंत नाईक यांच्या निवासस्थानी ११ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेआठ वाजता साधूच्या वेशात दोन संशयित आले. आपण देवदूत असल्याचा दावा करत घरात धार्मिक विधी करण्याची विनंती केली. अमिता नाईक यांनी श्रद्धेच्या भावनेतून याला होकार दिला. भीमराव शिंदे व विजय शिंदे या दोघांनी विधी करण्यास सुरुवात झाली. त्यानंतर दोघांनी तुमच्याकडे जेवढे दागिने असतील ते काही काळ देवाला अर्पण करूया, नंतर ते परत घ्या, असे तिला सांगितले. तिने श्रद्धा ठेऊन दागिने त्यांच्या हवाली केले. काही क्षणातच त्या दोघांनी सर्व दागिने घेऊन तिथून पळ काढला. यानंतर अमिता नाईक यांनी मांद्रे पोलिसांकडे ११ फेब्रुवारी रोजी तक्रार नोंदवली. त्या तक्रारीच्या अनुषंगाने मांद्रे पोलीस निरीक्षक शेरीफ जेकिस यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथके तयार करण्यात आली. सोलापूर येथे जात त्या दोघांना पोलिसांनी अटक केली.
सदर संशयित आणखी कोणत्या गुन्ह्यात सामील आहेत का? याचा तपास मांद्रे पोलीस करत आहेत. मांद्रे पोलिसांनी भारतीय दंड संहिता कलम ३१८ (२) ३१६ (२) या कलमाखाली गुन्हा नोंदवला.
सोलापूर येथे दोघांना केली अटक
तक्रार दाखल केल्यानंतर मांद्रे पोलिसांनी तपासास सुरुवात केली. ते दोघे सोलापूर येथे गेल्याचे त्यांना समजले. त्यानंतर मांद्रे पोलीस पथकाने कोळेगाव मोहोळ रेल्वे स्टेशन (सोलापूर) या ठिकाणी दोन्ही संशयितांना मुद्देमालासहित ताब्यात घेतले. यानंतर त्यांना अटक केली.