आयरिश रॉड्रिग्ज यांना अनिवासी भारतीय ओळखपत्र

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
15 hours ago
आयरिश रॉड्रिग्ज यांना अनिवासी भारतीय ओळखपत्र

पणजी : केंद्रीय गृह मंत्रालयाने अॅड. आयरिश रॉड्रिग्ज यांना अनिवासी भारतीय ओळखपत्र (ओसीआय कार्ड) जारी केले आहे. या संदर्भात गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयाने गृहमंत्रालयाला रॉड्रिग्ज यांच्या ओसीआय कार्डसाठीच्या नव्या अर्जावर चार आठवड्यांत निर्णय घेण्यास सांगितले होते.

अॅड. आयरिश रॉड्रिग्ज यांचा २४ मे १९६० रोजी गोव्यात जन्म झाला. त्यावेळी गोवा पोर्तुगीजांचा प्रदेश होता. १९ डिसेंबर १९६१ रोजी गोवा मुक्त झाला. त्यावेळी जन्माने पोर्तुगीज असलेल्या इतर नागरिकांबरोबर त्यांनाही भारताचे नागरिकत्व बहाल करण्यात आले. दरम्यान, रॉड्रिग्ज यांनी भारतीय नागरिकत्व न सोडता पोर्तुगीज नागरिकत्व घेतल्याचा संशय व्यक्त करून उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी २८ मे २०१९ रोजी त्यांची चौकशी सुरू केली होती. त्यानंतर २९ जानेवारी २०२१ रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश जारी केला. त्याला रॉड्रिग्ज यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिल्यानंतर न्यायालयाने आदेश जारी करून रॉड्रिग्ज यांची बाजू एेकून घेऊन नागरिकत्वावर निर्णय घेण्यास सांगितले होते. यावर संबंधिताकडून काहीच प्रक्रिया होत नसल्यामुळे, त्यांनी पोर्तुगालमध्ये जाऊन चौकशी केली. तिथे नागरिकत्व संबंधित प्रक्रिया करून १५ मे २०२३ रोजी त्यांना पोर्तुगीज पासपोर्ट देण्यात आला. त्यानंतर ३१ मे २०२३ रोजी ते एक्स (X misc) व्हिसावर गोव्यात आले. त्यानंतर त्यांनी भारतीय पासपोर्ट, निवडणूक कार्ड रद्द करून घेतले. जून २०२३ मध्ये ऑनलाईन पद्धतीने ओव्हरसीज सिटिझन ऑफ इंडिया (ओसीआय) कार्डसाठी अर्ज केला होता. याच दरम्यान त्यांच्या विरोधात न्यायालयात खटला सुरू असल्याचे समोर आले. त्यांनी पुन्हा ५ मार्च २०२४ रोजी ओसीआय कार्डसाठी सर्व प्रक्रिया करून अर्ज सादर केला. त्यानंतर त्यांना वैद्यकीय कारणास्तव म्हापसा येथील प्रथमवर्ग न्यायालयाने २० मे २०२४ ते १६ जानेवारी २०२५ पर्यंत विदेशात जाण्यास मोकळीक दिली.

प्रक्रियेनंतर गृहमंत्रालयाकडून ओसीआय कार्ड बहाल

६ जून २०२४ रोजी त्यांचा ओसीआय कार्डचा अर्ज फेटाळण्यात आला. याला रॉड्रिग्ज यांनी गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले असता, न्यायालयाने गृहमंत्रालयाला आदेश देऊन त्यांच्या ओसीआय कार्डावर चार आठवड्यांत निर्णय घेण्यास सांगितले होते. त्यानुसार रॉड्रिग्ज यांनी संबंधित प्रक्रिया केल्यानंतर गृह मंत्रालयाने अखेर त्यांना ओसीआय कार्ड बहाल केले आहे.