महानंद नाईकच्या क्रूर कारवायांवर येतोय माहितीपट

‘डॉक्युबे’वर २१ मार्च रोजी प्रीमियर : १६ महिलांचा खून केल्याचा आरोप

Story: न्यूज डेस्क । गाेवन वार्ता |
11th March, 12:30 am
महानंद नाईकच्या क्रूर कारवायांवर येतोय माहितीपट

मुंबई : डॉक्युबे (DocuBay) या डॉक्युमेंटरींसाठी प्रसिद्ध प्लॅटफॉर्मवर 'दुपट्टा किलर' हा गोव्यातील खऱ्याखुऱ्या गुन्हेगारी घटनांवर आधारित माहितीपट २१ मार्च रोजी प्रदर्शित होत आहे. महानंद नाईक (Mahanand Naik) या सिरियल किलरची कथा यात उलगडून दाखविली आहे.


महानंद नाईकवर १६ महिलांचा खून केल्याचा आरोप होता. परंतु आतापर्यंत केवळ एका प्रकरणातच त्याला शिक्षा झाली. पीडित युवतींना लग्नाचे खोटे आमिष दाखवून त्यांच्याच दुपट्ट्यांनी गळा दाबून मारणे ही त्याची खुनाची पद्धत होती. खून केल्यानंतर महानंद त्या युवतीकडील दागिने, पैसे घेऊन पोबारा करत असे.

दिग्दर्शक पॅट्रिक ग्राहम यांच्या माहितीपटाचा उद्देश महानंद नाईकच्या गुन्ह्यांमधील मानसशास्त्र आणि वर्षानुवर्षे न्यायापासून दूर राहण्यास भाग पाडणाऱ्या कार्यपद्धतींचा अभ्यास करणे हा आहे. महानंदने लग्न या संवेदनशील विषयाशी निगडीत भावभावनांचा फायदा उठवून असुरक्षित महिलांना कसे लक्ष्य केले, यावर या माहितीपटात लक्ष केंद्रित केले आहे. १५ वर्षांच्या तुरुंगवासानंतर नाईकच्या संभाव्य सुटकेवरून होऊ शकणाऱ्या वादाबाबतही​ प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे.

डॉक्युबेची मूळ कंपनी आयएन१० मीडिया नेटवर्कचे व्यवस्थापकीय संचालक आदित्य पिट्टी यांनी या माहितीपटाला ‘आपल्या न्यायव्यवस्थेतील महत्त्वाच्या समस्या आणि समाजावर गुन्ह्यांचे दीर्घकालीन परिणाम याची एक शक्तिशाली आठवण करून देणारा माहितीपट’ म्हटले आहे.

जगरनॉट प्रॉडक्शनचे सीईओ तथा निर्माता समर खान यांनी या प्रकल्पाचे सामाजिक महत्त्व नोंदवले. काल्पनिक कथा वाढत्या प्रमाणात लोकप्रिय होत असताना, आम्ही माहितीपटांमधून अर्थपूर्ण सामाजिक प्रभाव पाडण्याची अद्वितीय क्षमता ओळखून काम करतो, असे सांगितले.


मुंबईत मुख्यालय असलेले डॉक्युबे आंतरराष्ट्रीय माहितीपटांचे प्रवाहीकरण करण्यात माहिर आहे. १७० हून अधिक देशांमध्ये अॅपल टीव्ही, फायर टीव्ही, रोकू आणि सॅमसंग टीव्हीसह अनेक प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे.

या माहितीपटाचे दिग्दर्शन करणे हे एक कठीण आव्हान होते. कारण त्यासाठी संवेदनशील मुद्द्यांना हाताळणे आणि काळजीपूर्वक गुंतागुंतीची कथा सांगण्याचा मार्ग शोधणे आवश्यक होते. ही कथा आधी सांगितली गेली असली, तरी आम्ही गुन्ह्याच्या पलीकडे जाऊन तिचा वेध घेतला आहे.
- पॅट्रिक ग्राहम, दिग्दर्शक