पणजी : केपे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका निवृत्त पोलीस उपनिरीक्षकाकडून एका महिलेच्या घरात घुसून विनयभंग करत लैंगिक छळ करण्याचा प्रकार घडला. केपे पोलिसांकडून याप्रकरणी गुन्हा नोंद करत तपास करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, केपे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका निवृत्त पोलीस उपनिरीक्षकाने महिलेच्या घरात प्रवेश केला. तिचे केस ओढले व विनयभंग होईल असे हावभाव करून दाखवले. तिच्यावर जबरदस्ती करत तिच्याकडे लैंगिक संबंधाची मागणी केली. तिने नकार दिल्यानंतर तिला शिवीगाळ करत तिची प्रतिमा मलीन करण्याचीही धमकी दिली.
याप्रकरणी महिलेने केपे पोलिसांत धाव घेत तक्रार नोंद केली. त्यानंतर समुपदेशकाच्या मदतीने महिलेकडून घडल्या प्रकाराची माहिती घेण्यात आली. दरम्यान, केपे पोलिसांकडून सदर संशयित निवृत्त पोलीस उपनिरीक्षकाविरोधात विनयभंग करण्याच्या उद्देशाने हल्ला करणे, लैंगिक छळ, विनयभंग होईल असे कृत्य करणे, शारीरिक इजा पोहोचवण्याची धमकी देणे, बेकायदेशीररीत्या घरात प्रवेश करत गुन्हेगारी कृत्य करणे या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याप्रकरणी केपे पोलिसांकडून पुढील तपास केला जात आहे.