मडगाव : दवर्ली परिसरातून अल्पवयीन मुलीच्या अपहरणाची घटना ७ मार्च रोजी घडली होती. याप्रकरणी मायना कुडतरी पोलिसांनी कोल्हापूर येथून संशयित जोशुवा बांदेवडार (निर्मलानगर, शेल्डे) याला ताब्यात घेत गोव्यात आणून अटक केली. पीडित मुलीचीही सुटका केलेली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मारुती मंदिर दवर्ली या परिसरातून संशयित जोशुवा याने एका १६ वर्षीय मुलीला पळवून नेले होते. याप्रकरणी पीडितेच्या पालकांनी मायना कुडतरी पोलिसांत तक्रार नोंद केलेली होती. त्यानुसार मायना कुडतरी पोलिसांकडून शोधकार्य सुरू करण्यात आले. पोलिसांनी टेक्निकल सर्व्हिलन्सचा वापर करत मिळवलेल्या माहितीनुसार संशयित पीडितेसह कोल्हापुरात असल्याचे समजले. त्यानुसार मायना कुडतरी पोलिसांकडून कोल्हापुरात पथक पाठवून स्थानिक पोलिसांनाही याबाबत माहिती देत त्यांच्या सहकार्यातून संशयिताला ताब्यात घेतले. त्यावेळी पीडित मुलीचीही त्याच्या ताब्यातून सुटका केली. गोव्यात आणून चौकशीअंती संशयित जोशुवा याच्यावर गोवा बाल संरक्षक कायद्यांतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला व संशयिताला अटक करण्यात आली. याप्रकरणी मायना कुडतरी पोलीस निरीक्षक अरुण गावस देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली आशुतोष नाईक पुढील तपास करत आहेत.