कुडका येथे स्वयंअपघातात एकाचा मृत्यू

जखमी दुचाकीस्वारावर गुन्हा नोंद

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
11th March, 12:17 am
कुडका येथे स्वयंअपघातात एकाचा मृत्यू

म्हापसा : कुडका तिसवाडी येथील चर्चजवळ रस्त्याच्या बाजूच्या क्रश बॅरियर संरक्षक कठड्याला दुचाकीची धडक दिल्याने झालेल्या स्वयंअपघातात जखमी गोकुळदास लिंगू करमलकर (४९, रा. सकल भाट, करमळी) यांचा मृत्यू झाला. अपघातास कारणीभूत दुचाकी चालक रूपेश घनःश्याम करमलकर (३०, रा. खडीवाडा, करमळी) या चुलत भावाविरुद्ध गुन्हा नोंद.
सदर अपघात शनिवारी दि. ८ रोजी रात्री ११.३५ च्या सुमारास कुडका येथील सांतान चर्चच्या जवळ घडला होता. संशयित व मयत हे चुलत भाऊ जीए ०३ एके २७२२ क्रमांकाच्या अप्रिलिया स्कुटरवरून जुने गोवे येथील बायपास ते कुडकाच्या दिशेने जात होते.
भरधाव स्कुटर कुडका येथे घटनास्थळावरील वळणावर पोहोचताच संशयित दुचाकीस्वारचे दुचाकीवरील नियंत्रण गेले व दुचाकीची जोरदार धडक रस्त्याच्या बाजूच्या क्रेश बॅरियरला बसली. याबरोबर दुचाकीवर मागे बसलेला गोकुळदास करमलकर हा रस्त्यावर कोसळून गंभीर जखमी झाला. तर चालक रूपेश करमलकर हा किरकोळ जखमी झाला. जखमींना लगेच बांबोळी येथे गोमेकॉत दाखल केले. तिथे उपचार सुरू असताना मृत्यू झाला. तर संशयित दुचाकीस्वाराला उपचारानंतर घरी पाठवण्यात आले.
आगशी पोलिसांनी संशयिताविरुद्ध भा.न्या.सं.च्या २८१ व १०६ कलमांन्वये गुन्हा नोंद केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अनंत गावकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक ऋषिकेश रायकर हे करीत आहेत.