साळावलीची मुख्य जलवाहिनी फुटून पारोडा येथे लाखो लिटर पाणी वाया

सासष्टी, मुरगाव तालुक्यांतील पाणी पुरवठ्यावर परिणाम

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
14 hours ago
साळावलीची मुख्य जलवाहिनी फुटून पारोडा येथे लाखो लिटर पाणी वाया

मडगाव : साळावली येथून पाणी पुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी पारोडा केपे याठिकाणी मंगळवारी दुपारी फुटली. यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले. सासष्टी, मुरगाव तालुक्यातील पाणीपुरवठ्यावर परिणाम झालेला असून बुधवारपर्यंत दुरुस्तीकाम पूर्ण होण्याची शक्यता आहे.
साळावली येथील जलप्रकल्पातून वास्कोच्या दिशेने येणारी १४०० मिमीची मुख्य जलवाहिनी मंगळवारी दुपारी फुटली. जलस्रोत खात्याचे काम सुरू असताना जेसीबीमुळे जलवाहिनीला धक्का बसला व हा प्रकार घडला. जलवाहिनी फुटल्यानंतर मोठ्या कारंज्याप्रमाणे पाण्याचा फवारा उडू लागला व लाखो लिटर पाणी वाहून पारोडा परिसरातील रस्त्यांवरुन पाण्याचे लोट वाहू लागले होते. यामुळे स्थानिकांनाही रस्त्यावरुन येजा करण्यास त्रास झाला.
स्थानिक पंच शैलेश जाोतकर यांनी सांगितले की, मंगळवारी दुपारी जलवाहिनी फुटण्याची घटना घडली. जलस्रोत खात्याकडून कालव्याच्या समांतर वाहिनी घालण्यासाठी खोदकाम केले जात असताना ही जलवाहिनी फुटली व लाखो लिटर पाणी वाया गेले. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकार्‍यांना याची माहिती दिलेली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार मुख्य जलवाहिनीतील पाणी पुरवठा बंद केला जाईल. त्यानंतर जलवाहिनीतील पाणीपुरवठा बंद होण्यासाठी व खाली होण्यासाठी साधारणतः सात तासांचा अवधी लागेल. त्यानंतर दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केली जाईल. बुधवारपर्यंत पाणी पुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितल्याचे जोतकर यांनी सांगितले.      

हेही वाचा