पेपर तपासणीच्या केंद्रांची संख्या यंदा तीनवरून आठ!

पेपर तपासणीचे काम सुरळीत; भगीरथ शेट्ये यांची माहिती

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
11th March, 10:43 am
पेपर तपासणीच्या केंद्रांची संख्या यंदा तीनवरून आठ!

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : दहावी बोर्ड परीक्षेच्या पेपर तपासणीसाठी यंदा केंद्राची संख्या तीनवरून आठ करण्यात आली आहे. त्यामुळे पेपर तपासणीसाठी नेमण्यात आलेल्या शिक्षकांचा प्रवासाचा त्रास वाचला असून, पेपर तपासणीचे काम सुरळीत असल्याची माहिती गोवा बोर्डचे अध्यक्ष भगीरथ शेट्ये यांनी 'गोवन वार्ता'शी बोलताना दिली. 

पेपर तपासणीसाठी स्थापन केलेल्या केंद्रांवर अपुरे शिक्षक असल्याने पेपर तपासणीत अडचणी येत असल्याची तक्रार काही केंद्रावरून होत होती. परंतु, शेट्ये यांनी या तक्रारीत तथ्य नसल्याचे सांगितले. याआधी राज्यात पेपर तपासणीसाठी केवळ तीनच केंद्रे असायची. त्यामुळे शिक्षकांची धावपळ उडत होती. 

ही बाब लक्षात घेऊन यंदा उत्तर गोव्यात पेडणे, म्हापसा, कुजिरा आणि डिचोली येथे, तर दक्षिण गोव्यात केपे, कुंकळ्ळी, फोंडा आणि मडगाव येथे केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. अनिवार्य विषयांच्या पेपर तपासणीसाठी पुरेसे शिक्षक देण्यात आले. 

हिंदीच्या पेपर तपासणीसाठी राज्यात सुमारे ५०० शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या शिक्षकांना जवळच केंद्रे मिळाल्याने त्यांच्याकडून सकाळी ८ वाजल्यापासूनच पेपर तपासणीचे काम सुरू होत आहे, असे शेट्ये म्हणाले.

डिचोली केंद्रासाठी अतिरिक्त सहा शिक्षक
डिचोली केंद्रासाठी सध्या तितके शिक्षक देण्यात आले आहेत ते पुरेसे आहेत. तरीही आणखी दोन दिवसांनी तेथे अतिरिक्त सहा शिक्षक देण्यात येतील, असेही शेट्ये यांनी नमूद केले.

हेही वाचा