सहा हजार नावे वगळली : पडताळणी, पैसे वसूल करण्याची प्रक्रिया सुरू
पणजी : बोगस आणि मृत झालेल्या ६,००० लाभार्थ्यांची नावे दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेतून वगळण्यात आली आहेत. बोगस लाभार्थी तसेच मृतांच्या कुटुंबियांकडून पैसे वसूल करण्यास सुरुवात केली असून आतापर्यंत १३ कोटी वसूल करण्यात आले आहेत.
जे बोगस आणि मृत झालेले लाभार्थी अजूनही लाभ घेत आहेत, त्यांची पडताळणी केली जाणार आहे. यामुळे या योजनेचे पैसे मिळण्यास विलंब होणार आहे, असे समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांनी सांगितले.
दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेचे पैसे ज्येष्ठ नागरिकांना वेळेत मिळत नाहीत, अशा तक्रारी आल्या होत्या. या विषयी बोलताना मंत्री फळदेसाई यांनी सांगितले की, बऱ्याच वेळा पैसे मृत झालेल्या व्यक्तींच्या नावावर जात असल्याचे आमच्या नजरेस आले आहे आणि यामुळे पैसे मिळण्यास थोडा विलंब होत आहे.
आतापर्यंत या योजनेचा लाभ घेणारे ६ हजार बोगस आणि मृत ज्येष्ठ नागरिकांच्या खात्यात पैसे जात आहेत, असे दिसून आले. हे पैसे वसूल करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. आम्ही या ६ हजार लाभार्थ्यांच्या जागी नवीन आलेल्या लाभार्थ्यांचे अर्ज भरण्यास सुरुवात केली आहे. एकूण १.३० लाख लाभार्थ्यांमधील ६ हजार अवैध रितीने लाभ घेत होते, असे फळदेसाई यांनी सांगितले.
या योजनेचा अवैध रितीने लाभ घेणाऱ्या लोकांकडून गेल्या वर्षी आम्ही १३ कोटी वसूल केले आहेत. यापूर्वी या संदर्भात कोणीही त्याकडे लक्ष दिले नव्हते, पण वसुली सुरू झाल्याने जे बोगस लाभार्थी आहेत त्यांची नावे आता पुढे येणार आहेत.
असे पैसे मोठ्या प्रमाणात वसूल झाले आहेत. अनेक बँकांमध्ये थोडे थोडे पैसे पडून होते. ते सर्व निश्चित करून त्याचे ऑडिट केल्यानंतर वसुली सुरू केली आहे, असे फळदेसाई म्हणाले.
पडताळणीस विलंब, मात्र उपाय काढू!
दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेचे पैसे दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ कधीही द्यायचे राहिलेले नाहीत. डिसेंबरमध्ये येणारे पैसे जानेवारीच्या शेवटी किंवा फेब्रुवारीत मिळतात. ऑनलाईन यंत्रणेद्वारे हे पैसे एकाच वेळी पाठवणे शक्य होत नाही. याचे कारण म्हणजे जेव्हा आम्ही ही प्रक्रिया करायला घेतली, तेव्हा हे पैसे मृत व्यक्तींच्या खात्यांवर जात असल्याचे आमच्या लक्षात आले.
याची पडताळणी करण्यासाठी गोवा इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (जीईएल) आणि इतर यंत्रणा थोडा वेळ घेतात. त्यावर आम्ही उपाय शोधत आहोत, असे फळदेसाई यांनी सांगितले.