अंधश्रद्धा समाजासाठी घातकच : ‘चर्चेची वार्ता’ मध्ये वाचकांचा अभिप्राय
पणजी : दै. गोवन वार्ताच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील ‘चर्चेची वार्ता’ या सदरात वाचकांना गोव्यात अंधश्रद्धा विरोधी कायद्याची गरज आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. याविषयावर वाचकांनी आपल्या संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
जिथं पंतप्रधान, गृहमंत्री आणि मुख्यमंत्री आपापल्या हाताला दहा-बारा गंडे दोरे बांधतात, तिथं अंधश्रद्धा निर्मूलन कसे होईल. - साईनाथ देसाई
कायदा लागू करून थोडेच बंद होणार आहे. - उमेश परवार
हल्ली कायदे कितीही अस्तित्वात आणले तरी ते गुन्हा करतेवेळी गुन्हेगार विचार करीत नाही. अंधश्रद्धा ही दुसऱ्याच्या मनात निर्माण करणाऱ्याला कडेकोट शिक्षा होईल असा कायदा पाहिजे. - देवेश तारी
महाराष्ट्रात गाजावाजा करून केलेला अंधश्रद्धा विरोधी कायदा प्रत्यक्षात जादूटोणा आणि त्यातून होणाऱ्या फसवणुकीसंबंधित कायदा आहे. प्रचलित क्रिमिनल लॉमधील तरतुदींचीच त्यात पुनरावृत्ती आहे. कायदा करून अंधश्रद्धा निर्मूलन करता येईल हीच एक अंधश्रद्धा आहे. - अनिल परूळेकर
आधी मनगटावर १०-२० धागेदोरे बांधायचे बंद करा. मग काय ते बोला. कायदा आणून तरी काय करणार. जर पैसे वाले कायदा करण्यालाच विकत घेत असेल तर.. तुमचा कायदा काय कामाचा . - महेश तळवणेकर
श्रद्धा कुठली आणि अंधश्रद्धा कुठली हेच अजून खूप लोकांना उमजले नाही. प्रत्येकाची व्याख्या बदलत चालली आहे. संपूर्ण वातावरण असे बनले आहे किंवा बनवले जात आहे. त्यात काठावर बसलेलेही चक्क वाहून जात आहेत... लाखोंच्या संख्येने. - भारत बागकर
आपल्या गोवेकरांची अंधश्रद्धा इतकी खालावलेली नाही की, आपल्याला मूल व्हावं म्हणून दुसऱ्याच्या मुलाचा बळी देईल. आणि हो काही अंधश्रद्धा या चांगल्या पण होत्या त्यामुळे लुटमार, घरफोडी, स्त्रीयांवर अत्याचार हे थोडेफार कमी होते. यामागचे कारण एकच होते आपण कुणाला दुखावले, कुणाचा वाटा हिसकावला तर देव आपल्यावर कोपेल, आपल्याला पापलागून शारीरिक व्याधी होईल. म्हणून लोक पाप करावयास भ्यायचे. मला तरी वाटते अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याची गरज नाही. तसे झाले तर माणूस पापभिरू राहणार नाही, देवावर कर्मावर विश्वास ठेवणार नाही आणि कित्येक पापांचे डोंगर उभे करील. - रामनाथ परब
अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याची फक्त गोव्यात नव्हे, संपूर्ण भारतात आवश्यकता आहे. - नितीन गावडे
श्रद्धा व अंधश्रद्धा यामध्ये एक थिन लाईन आहे. नास्तिक व्यक्तीचीही आपल्या नास्तिकतेवर श्रद्धा असते! श्रद्धाळू व्यक्ती उजवी, चांगली असतेच असे नाही तसेच नास्तिक व्यक्ती ही वाईट नसते. गोव्यात देवभिरू माणसांची संख्या मोठी आहे. हे पूर्वापार चालत आले आहे. फक्त या विषयात राजकारण येऊं नये हे महत्त्वाचे! तसे गोव्यात पूर्वी नव्हते जे अलीकडे दिसून येते. - अनिल जोग