आता महामार्गावरील बोगदा प्रकल्प कामांसाठी मिळणार 'कोरे'चे तांत्रिक सहकार्य

रस्ते वाहतूक मंत्रालय व कोकण रेल्वे यांच्यात सामंजस्य करार

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
8 hours ago
आता महामार्गावरील बोगदा प्रकल्प कामांसाठी मिळणार 'कोरे'चे तांत्रिक सहकार्य

मडगाव : राष्ट्रीय महामार्गावरील बोगद्यांचे काम केले जात असताना आता कोकण रेल्वेचे तांत्रिक सहकार्य मिळणार आहे. बोगद्यांच्या निर्मितीवेळी तांत्रिक सहकार्यासाठी रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाकडून कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडशी करार करण्यात आलेला आहे.



कोकण रेल्वेच्या मार्गावरील बोगद्यांची निर्मिती व त्यांच्या देखभाल दुरुस्तीच्या कामांत कोकण रेल्वे कॉर्पोरेशन कडून चांगले काम केले गेलेले आहे. याचाच फायदा आता राष्ट्रीय महामार्गावरील बोगद्यांच्या कामांमध्ये करून घेण्यात येणार आहे. त्यासाठीं कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड व रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालय यांच्यामध्ये नवी दिल्ली येथे सामंजस्य करारावर सह्या करण्यात आलेल्या आहेत.

 

कोकण रेल्वेचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाचे महासंचालक सुदीप चौधरी यांच्यासह कोकण रेल्वे व रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांच्या उपस्थितीत हा करार झाला. कोकण रेल्वेच्या कौशल्यांचा फायदा घेत बोगद्यातील सुरक्षा आणखी मजबूत करणे, बोगदा प्रकल्पांसाठी उपाययोजनांची शिफारस करणे, राष्ट्रीय महामार्गावरील परस्पर फायद्याच्या इतर क्षेत्रांचा समावेश करणे आदी गोष्टींवर लक्ष दिले जाणार आहे.

या सहकार्य करारामुळे सुरक्षिततेच्या पर्यायात वाढ होईल, बोगदा प्रकल्पांची अंमलबजावणी आवश्यकतेनुसार होणार आहे. या सामंजस्य करारामुळे तांत्रिकदृष्ट्या उत्कृष्टता व पायाभूत सुविधा सुरक्षितता यांच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाउल टाकण्यात आलेले आहे. देशभरातील राष्ट्रीय महामार्गावरील प्रकल्पांतील सुधारणा करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.