गेल्यावर्षी विक्रमी पाऊस झाल्याचा परिणाम
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : राज्यात गतवर्षीच्या मार्चच्या पहिल्या आठवड्याच्या तुलनेत यंदा सहापैकी पाच धरणांत अधिक पाणीसाठा शिल्लक आहे. साळावली, अंजुणे, चापोली, पंचवाडी, गावणे धरणात गेल्या वर्षीपेक्षा अधिक पाणीसाठा शिल्लक आहे, तर आमठाणे धरणातील पाणीसाठा गतवर्षीपेक्षा कमी आहे. जलस्रोत खात्यातून ही माहिती मिळाली आहे. मागील वर्षी मान्सूनने विक्रमी हजेरी लावली होती. यामुळे धरणात अद्यापही पुरेसा पाणीसाठा आहे. असे असले तरी मार्च ते मे दरम्यान उष्णतेमुळे पाण्याची मागणी वाढण्याची शक्यता आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १ मार्च २०२४ मध्ये दक्षिण गोव्याची तहान भागवणाऱ्या साळावली धरणात ६८ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. तर १ मार्च २०२५ अखेरीस या धरणात ७३.९४ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. अंजुणे धरणात मागील वर्षी केवळ ५५.९८ टक्के पाणीसाठा होता. यावर्षी १ मार्च अखेरीस अंजुणेत ६१.१६ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गतवर्षी पंचवाडीत ५२.९५ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. यावर्षी ५७.५० टक्के पाणीसाठा आहे. गतवर्षी गावणे धरणात ६३.६७ टक्के, तर यावर्षी ७३.२२ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गतवर्षी १ मार्च रोजी आमठाणेत ४९.७४ टक्के इतका पाणीसाठा होता. यंदा १ मार्च अखेरीस आमठाणेत ४२.२२ टक्के पाणीसाठा आहे.