आगामी निवडणुकांत ‘आप’चा स्वबळाचा नारा

आतिशींकडून स्पष्ट : काँग्रेस, आरजीपीकडून टीका


11th March, 12:08 am
आगामी निवडणुकांत ‘आप’चा स्वबळाचा नारा

पत्रकार परिषदेत बोलताना आपच्या नेत्या आतिशी. सोबत अमित पालेकर, आमदार व्हेंझी व्हिएगस, क्रूझ सिल्वा व इतर.

प्रतिनिधी। गोवन वार्ता
मडगाव : जिल्हा पंचायत, नगरपालिका व २०२७ च्या विधानसभा निवडणुका आम आदमी पक्ष (आप) स्वबळावर लढणार आहे. वारंवार धोका देणाऱ्या काँग्रेसवर लोकांचा विश्वास नाही. भाजप भ्रष्टाचारात गुंतला आहे. आगामी निवडणुकांत ‘आप’ला आणखी जास्त जागा मिळतील, असा विश्वास दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री व आपच्या नेत्या आतिशी यांनी व्यक्त केला.
आपच्या नावेली येथील दक्षिण गोवा संपर्क कार्यालयाचे उद्घाटन अतिशी यांच्या हस्ते झाले. यावेळी अमित पालेकर, आमदार व्हेंझी व्हिएगस, आमदार क्रूझ सिल्वा, जिल्हा पंचायत सदस्य जोसेफ पिमेंता आदी उपस्थित होते. आतिशी पुढे म्हणाल्या, गोमंतकीयांकडून नेहमीच प्रेम मिळाले आहे. २०२२ च्या निवडणुकीत दोन आमदार व जिल्हा पंचायत सदस्य निवडून आले. मागील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे ११ आमदार निवडून आले होते. त्यातील ८ आमदार भाजपमध्ये गेले. जनता काँग्रेसच्या आमदारांना निवडून विधानसभेत पाठवते व ते भाजपमध्ये प्रवेश करतात. हे गोव्यात पहिल्यांदा झाले असे नाही. काँग्रेसने पुन्हा पुन्हा धोका दिला आहे. आपच्या आमदारांनी विरोधी पक्षात राहूनही लोकांचे प्रश्न विधानसभेत मांडले आहेत. काँग्रेस हा विश्वास ठेवण्यासारखा पक्ष नसल्याने युती नाही.


युतीचा निर्णय केंद्रीय नेते घेतील : पाटकर
आगामी जिल्हा पंचायत तसेच विधानसभा निवडणुकांमध्ये इतर पक्षांसोबत युती करायची की​ नाही, याचा निर्णय काँग्रेसचे केंद्रातील नेते निवडणुका जवळ आल्यानंतरच घेतील. पक्षाच्या आदेशानुसार आपण चाळीसही मतदारसंघांत काँग्रेसला बळकटी देण्यास सुरुवात केली आहे. त्याअनुषंगाने विविध मतदारसंघांत बैठकाही घेण्यात येत आहेत, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी दै. ‘गोवन वार्ता’शी बोलताना सांगितले.


मनोज परब यांची ‘आप’वर टीका
भाजप, काँग्रेस, आप या पक्षांनी नेहमीच रिव्हॉल्यूशनरी गोवन्सवर (आरजी) ‘बी’ टीम असल्याचा आरोप केला. परंतु, दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री तथा आमदार आतिषी यांनी पुढील निवडणुकांत ‘एकला चलो’चा नारा देत ‘बी’ टीम कोण आहे, हे दाखवून दिलेले आहे. याचा विचार करून गोमंतकीय जननेते पुढील निवडणुकांत कोणत्या पक्षाला पाठिंबा द्यायचा हे ठरवावे, असे मनोज परब यांनी नमूद केले.