शैक्षणिक वर्ष एक आठवडा उशिरा सुरू होण्याची शक्यता

अंतिम निर्णय मुख्यमंत्रीच घेणार


11th March, 11:55 pm
शैक्षणिक वर्ष एक आठवडा उशिरा सुरू होण्याची शक्यता

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : परीक्षेनंतर विद्यार्थ्यांना काही प्रमाणात विश्रांती मिळावी यासाठी शैक्षणिक वर्ष १ एप्रिलऐवजी एक आठवडा उशिरा सुरू करण्याचा निर्णय होण्याची शक्यता आहे. या विषयीचा अंतिम निर्णय मुख्यमंत्रीच घेतील, अशी माहिती सूत्रांनी दिली.
सहावी ते बारावीपर्यंतचे (आकरावी वगळून) वर्ग १ एप्रिलपासून सुरू करण्याचा निर्णय शिक्षण खात्याने घेतला आहे. या विषयीचा आदेश शिक्षण संचालकांनी जारी केला आहे. या निर्णयाला काही पालकांचा विरोध आहे. उष्म्याचा विद्यार्थ्यांना त्रास होऊ शकतो. परीक्षेनंतर विद्यार्थ्यांना विश्रांती मिळणार नाही. त्यामुळे शैक्षणिक वर्ष नेहमीप्रमाणे १ जूनपासूनच सुरू करण्याची मागणी काही पालकांनी केली आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह शिक्षण संचालक, शिक्षण सचिव यांना निवेदन देण्यात आले आहे. काही  पालकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यामुळे हा विषय न्यायप्रविष्ठ झाला आहे.
विषय न्यायप्रविष्ठ बनल्याने निर्णयात अडथळा
शै‌क्षणिक वर्ष आठवडाभर लांबणीवर ढकलण्याचा प्रस्ताव होता. तो मुख्यमंत्र्यांसमोर ठेवला जाणार होता; परंतु आता हा विषय न्यायालयात पाेहोचल्यामुळे यात अडचण येऊ शकते. शैक्षणिक वर्ष केव्हा सुरू करायचा याचा निर्णय न्यायालयाच्या निर्णयावर अवलंबून राहील, अशी माहिती अधिकाऱ्याने दिली.