विरोधी आमदारांची हमी : कायद्याची राज्याला नितांत गरज असल्याचे मत
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्यांवर कडक कारवाईसाठी राज्यात अंधश्रद्धाविरोधी कायदा लागू झालाच पाहिजे. त्यासंदर्भात आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात आपण आवाज उठवणार आहोत, असे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, आमदार विजय सरदेसाई आणि वीरेश बोरकर यांनी सोमवारी दै. ‘गोवन वार्ता’शी बोलताना स्पष्ट केले.
अंधश्रद्धाविरोधी कायद्याची राज्याला निश्चित गरज आहे. काही लोक स्वत:च्या आर्थिक आणि इतर स्वार्थासाठी समाजात अंधश्रद्धा पसरवत आहेत. त्यात सर्वसामान्य जनता अडकली जात आहे. याचा समाजावर वाईट परिणाम होत आहे. अशा स्थितीत अंधश्रद्धाविरोधी कायदा आणून त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी केल्यास अंधश्रद्धा पसरवणाऱ्यांवर कारवाई करणे सोपे होणार आहे, असे गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी नमूद केले. उसगाव येथील चार वर्षीय मुलीच्या प्रकरणाबाबत विचारले असता, या प्रकरणाचा पोलिसांकडून तपास सुरू आहे. परंतु, मंत्री तथा स्थानिक आमदार विश्वजीत राणे यांनीही या प्रकरणानंतर अंधश्रद्धचे प्रकार नष्ट करण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात आपण हा विषय निश्चित घेणार असल्याचेही ते म्हणाले.
दरम्यान, उसगाव येथील चार वर्षीय मुलीची हत्या अंधश्रद्धेतून झाल्याचा संशय स्थानिकांना आहे. परंतु, पोलिसांनी हा संशय नाकारत पुढील तपास सुरू ठेवला आहे. याबाबत दै. ‘गोवन वार्ता’ने अंधश्रद्धा चळवळीतील कार्यकर्ते रमेश गावस आणि निवृत्त पोलीस अधिकारी सी. एल. पाटील यांच्याशी संपर्क साधल्यानंतर या दोघांनीही राज्यात वाढत असलेले अंधश्रद्धेचे प्रकार रोखण्यासाठी अंधश्रद्धाविरोधी कायदा आणण्याची आणि त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले होते.
भोंदू, मांत्रिकांची दुकाने बंद होणे गरजेचे : वीरेश बोरकर
राज्यात अंधश्रद्धेचे प्रकार वाढत आहेत. यात परप्रांतीयांचा सहभाग आहे. परराज्यांतील अनेकांनी गोव्यात येऊन याबाबत दुकाने थाटलेली आहेत. अशा भोंदू, मांत्रिकांवर कारवाई झालीच पाहिजे. त्यासाठी अंधश्रद्धाविरोधी कायद्याची नितांत आवश्यकता आहे. त्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनात आपण या विषयाला निश्चित वाचा फोडणार असल्याचे रिव्हॉल्युशनरी गोवन्सचे आमदार वीरेश बोरकर म्हणाले.
राज्यात अंधश्रद्धाविरोधी कायदा गरजेचा : युरी आलेमाव
राज्यात काळी जादू, नरबळी आदींसारख्या अंधश्रद्धा वाढीस लावणाऱ्या घटना घडल्या असतील, तर गृह खात्याने अशा प्रकरणांचा तत्काळ सखोल तपास करणे आणि अशा घटना रोखणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यासाठी राज्यात अंधश्रद्धाविरोधी कायदा येणे आणि त्या कायद्याची योग्यरीत्या अंमलबजावणी होणे गरजेचे आहे, असे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव म्हणाले.