राज्यात १३ वर्षांत ८ टक्क्यांनी वाढली महिलांची साक्षरता

महिला साक्षरता दरात गोवा देशात सहावा : मिझोरम अग्रस्थानी


11th March, 12:04 am
राज्यात १३ वर्षांत ८ टक्क्यांनी वाढली महिलांची साक्षरता

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : महिला साक्षरता दरात गोवा देशात सहाव्या स्थानी आहे. केंद्रीय सांख्यिकी खात्याने २०२३-२४ मध्ये केलेल्या कार्यशक्ती सर्व्हेक्षणानुसार (पीएलएफएस) गोव्यातील ९० टक्के महिला साक्षर आहेत. तर या दरम्यान महिला साक्षरतेची राष्ट्रीय सरासरी ७४.६ टक्के होती. केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री जयंत चौधरी यांनी लोकसभेत दिलेल्या लेखी उत्तरातून ही माहिती मिळाली आहे. याविषयी खासदार उज्ज्वल सिंग यांनी प्रश्न विचारला होता. २०११ मध्ये गोव्यातील ८१.८४ टक्के महिला साक्षर होत्या.
उत्तरात दिलेल्या माहितीनुसार, सांख्यिकी खात्याच्या कार्यशक्ती सर्व्हेक्षणामध्ये प्रत्येक राज्यातील महिला आणि पुरुषांच्या साक्षरता दराची माहिती गोळा केली जाते. २०२३-२४ च्या सर्व्हेक्षणनुसार मिझोरममधील महिला साक्षरता दर सर्वांत अधिक म्हणजे ९७ टक्के आहे. यानंतर नागालँड (९४.१ टक्के), केरळ (९४ टक्के), मेघालय (९३.५ टक्के), त्रिपुरा (९१.६ टक्के), गोवा (९० टक्के), मणिपूर (८९.७ टक्के), आसाम (८३.६ टक्के) या राज्यांच्या क्रमांक लागतो.
सर्वेक्षणानुसार देशात सिक्कीममधील महिला साक्षरता दर सर्वांत कमी म्हणजे ६५.८ टक्के आहे. यानंतर बिहार (६६.१ टक्के), आंध्र प्रदेश (६६.८ टक्के), मध्यप्रदेश (६७ टक्के), उत्तर प्रदेश (७०.४ टक्के), छत्तीसगढ (७०.६ टक्के), ओडिशा (७३.३ टक्के) ही राज्ये आहेत. केंद्र शासित प्रदेशात लक्षद्वीपमध्ये सर्वाधिक ९४.८ टक्के महिला साक्षर आहेत. लडाखमधील महिला साक्षरतेचे प्रमाण ७३.१ टक्के असल्याचे उत्तरात म्हटले आहे.
साक्षरता वाढवण्यासाठी ‘नव भारत साक्षरता कार्यक्रम’
देशभरात साक्षरता तसेच महिला साक्षरता वाढवण्यासाठी केंद्र सरकारकडून ‘नव भारत साक्षरता कार्यक्रम’ (यूएलएलएएस) ही योजना राबवली जाते. ही योजना राष्ट्रीय शिक्षण धोरणासोबत संलग्न आहे. यामध्ये शाळेमध्ये जाऊ न शकणाऱ्या १५ वर्षांवरील व्यक्तींना शिक्षण देण्यात येते. यामध्ये मूलभूत साक्षरता, मूलभूत शिक्षण, कौशल्य व अन्य व्होकेशनल कौशल्य शिकवले जाते. ही योजना ग्रामीण तसेच शैक्षणिकदृष्ट्या मागास भागात अधिक केंद्रित असल्याचे उत्तरात नमूद केले आहे.
महिलांच्या साक्षरतेच्या प्रमाणात वाढ
२०११ च्या जनगणनेनुसार गोव्यातील महिलांच्या साक्षरतेच्या प्रमाणात वाढ झाली आहे. २०११ मध्ये गोव्यातील ८१.८४ टक्के महिला साक्षर होत्या. २०२३-२४ मध्ये ही संख्या वाढून ९० टक्के झाली आहे.