आणखी तीन ते चार ब्लॉकचा होणार लिलाव
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : पुढील काळात आणखी तीन ते चार खाण ब्लॉकचा लिलाव करण्यासाठी दोन्ही जिल्ह्यांतील लिजांचा सर्व्हे खाण खात्याने सुरू केला आहे. सर्व्हे पूर्ण झाल्यानंतरच लिलावाची प्रक्रिया पुढे सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती खाण खात्यातील सूत्रांनी मंगळवारी दै. ‘गोवन वार्ता’शी बोलताना दिली.
गेल्या काही महिन्यांत खाण खात्याने नऊ ठिकाणच्या खाण ब्लॉकचा लिलाव केला. त्यावेळी लिजांचे सर्व्हे करण्यात आले नव्हते. त्यामुळे सहा ठिकाणच्या ब्लॉक लिलावावेळी समस्या निर्माण झालेल्या होत्या. आगामी काळात ब्लॉक लिलावावेळी कोणत्याही समस्या निर्माण होऊ नयेत. तसेच ज्यांना ब्लॉक मिळतील त्यांच्यासमोरही पुढील काळात समस्या उद्भवू नयेत, यासाठी दोन्हीही जिल्ह्यांतील लिजांचा सर्व्हे सुरू करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
दरम्यान, राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेला खाण व्यवसाय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गेल्या अनेक वर्षांपासून बंद आहे. त्याचा मोठा फटका राज्याच्या अर्थव्यवस्थेला बसत असल्याने सरकारने आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून खाण ब्लॉकचा लिलाव करण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत नऊ ठिकाणच्या ब्लॉकचा लिलावही करण्यात आला आहे.
मंदिरे, शाळा, लोकवस्तीचा आढावा
खाण खात्याचे अधिकारी गेल्या काही महिन्यांपासून लिजांचे दौरे करून त्या परिसरात असलेली मंदिरे, शाळा तसेच लोकवस्तीचा आढावा घेत आहेत. हा सर्व्हे पूर्ण झाल्यानंतर लिजांसंदर्भातील आराखडा तयार केला जाईल आणि तीन ते चार ब्लॉकच्या लिलावाची प्रक्रिया खात्याकडून सुरू होईल, असेही सूत्रांनी स्पष्ट केले.