प्राथमिक शिक्षणासंबंधी राज्याचे माध्यम धोरण स्पष्ट : मुख्यमंत्री

राज्याचा अर्थसंकल्प २६ मार्च रोजी सादर होणार

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
5 hours ago
प्राथमिक शिक्षणासंबंधी राज्याचे माध्यम धोरण स्पष्ट : मुख्यमंत्री

पणजी : प्राथमिक शिक्षणासंबंधी राज्याचे माध्यम धोरण स्पष्ट आहे. या धोरणाची कार्यवाही सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. प्राथमिक शिक्षणाच्या माध्यमाबाबत आमदार मायकल लोबोंनी केलेल्या मागणीवर मुख्यमंत्र्यांनी सदर प्रतिक्रिया दिली आहे.

स्व. भाऊसाहेब बांदोडकर यांनी सुरू केलेल्या प्राथमिक शाळा हळूहळू बंद पडत आहेत. प्राथमिक शाळा सुरू राहण्यासाठी प्राथमिक शिक्षणाचे माध्यम इंग्रजी करायला हवे. मराठी व कोकणीचा विषय सक्तीचा करायला हवा, अशी मागणी आमदार मायकल लोबो यांनी केली होती. याविषयी विचारले असता शिक्षण माध्यमाचे धोरण स्पष्ट असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

राज्याचा अर्थसंकल्प २६ मार्च रोजी सादर होणार -

अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे कामकाज ठरवण्यासाठी कामकाज सल्लागार समितीची बुधवारी बैठक झाली. याबाबत मुख्यमंत्री म्हणाले, राज्याचा अर्थसंकल्प २६ मार्च रोजी सादर होणार आहे. अधिवेशनात अर्थसंकल्प सादर होणार असला तरी त्यावर चर्चा होणार नाही. लेखानुदानाला मंजुरी दिली जाईल. पुढील अधिवेशनात अर्थसंकल्पावर चर्चा होणार असल्याने ते दीर्घ कालावधीचे असेल.