'एक हजार रुपयांना तीन तिकीटे' या दराने विक्री; खेळातील लाखोंच्या अर्थकारणावर प्रश्नचिन्ह
मडगाव : हाऊझी किंवा तांबोला या खेळाचा वापर स्पर्धा आयोजित करून गर्दी गोळा करण्यासाठी केला जात होता. मात्र, आता हाऊझीला मिळणारा प्रतिसाद एवढा वाढलेला आहे की स्पर्धांची बक्षिसे काही हजारांत तर हाऊझींची बक्षिसे लाखोंची झालेली आहे. समाजमाध्यमांवरुन तसेच बॅनर्स उभारून जाहिरात केली आहे. यातील अर्थकारणही वाढत चालले आहे.
दक्षिण गोव्यात सध्या अनेक स्पर्धांच्या ठिकाणी हाऊझी खेळ खेळला जातो. स्पर्धांच्या मधल्या वेळात अंक जाहीर केले जातात व स्पर्धा संपल्यावर फुल्ल हाउझीचे क्रमांक जाहीर केले जात असल्याने स्पर्धांसाठी प्रेक्षकांची गर्दी होत असल्याचे दिसून येते. दक्षिण गोव्यात म्युझिकल शो, फुटबॉलच्या स्पर्धा, कराओके स्पर्धा अशा कार्यक्रमांतील हाऊझीची क्रेझ वाढलेली आहे.
हाउझीसाठी गर्दी होत असल्याने हे प्रकार वाढलेले असले तरीही यातील लाखोंच्या अर्थकारणावर प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे. एक हजार रुपयांना तीन तिकीटे अशा दराने विक्री केली जाते. स्पर्धेच्या मध्यंतराच्या कालावधीत अंक जाहीर करत स्पर्धा संपल्यावर तत्काळ बक्षिसांची रक्कम विजेत्यांच्या हातात मिळते. त्यामुळे नशीब आजमवणार्या लोकांची गर्दी दिसून येत आहे.
रोख रकमेची बक्षिसे, स्पर्धेसाठी ठरावीक परवानग्या व मोठ्या प्रमाणात मिळणारा परतावा यामुळे हाउझीची क्रेझ आयोजकांना तसेच सहभागी नागरिकांना स्वस्त बसू देत नाही. ज्या ठिकाणी हाऊझी असेल त्याठिकाणी गर्दी होऊ लागल्याने या खेळातील लाखोंच्या बक्षिसांच्या रकमेवरील अर्थकारणाने लक्ष वेधून घेतलेले आहे.
सध्या नावेली येथील मंडळाकडून कोकणी म्युझिकल शोसाठी सुपर ग्रँड हाऊझीची घोषणा करण्यात आली असून त्यासाठी एकूण बक्षीसाची रक्कम १५ लाखांची आहेत. बाणावलीत १३ मार्च रोजी दहा लाखांचा, १४ मार्च रोजी ६ लाखांचा तर नावेली येथे १० लाखांचा हाऊझीचे आयोजन केले आहे. कमी वेळेत लाखो रुपये मिळवण्याच्या आशेने अनेकजण तिकीटे घेत आहेत. विशेष म्हणजे मिळालेल्या पैशांतून कराची रक्कमही वगळली जात नसल्याने लोकांचा प्रतिसाद वाढता आहे.
हाऊझी/ तांबोला म्हणजे नक्की काय?
हाऊझी किंवा तांबोला हा नंबरचा खेळ आहे. यात १ ते ९० क्रमांकांचा समावेश असून केवळ १५ क्रमांक असलेली कूपन्स सहभागींना दिली जातात. त्यानंतर आयोजक लकी ड्रॉप्रमाणे नंबर काढून जाहीर करतात व नागरिक आपल्या तिकीटावर तो क्रमांक शोधून त्यावर काट मारत असतात. टॉप लाइन, मिडल लाइन, बॉटम लाइन यासह जल्दी फाइव्ह व फुल्ल हाऊस असे प्रकार असतात, त्यात जल्दी फाइव्हला लोक जास्त पसंद करतात.
परताव्यातून खेळाडूंना, कलाकारांनाच अर्थसहाय्य- आयोजक
आयोजकांच्या म्हणण्यानुसार, स्पर्धांच्या ठिकाणी प्रेक्षकांच्या उपस्थितीसाठी हाऊझींचा वापर केला जात आहे. आलेल्या प्रेक्षकांसाठी मनोरंजनाचे साधन म्हणून देखील याकडे पाहिले जाते. यातून जे पैसे मिळतात, त्याचा वापर हा खेळाला, खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी, म्युझिकल शोचा खर्च काढून कलाकारांना थोडा आर्थिक हातभार देण्यासाठी केला जातो. यासाठी आवश्यक त्या परवानगी जिल्हाधिकारी व पोलीस प्रशासनाकडून घेण्यात येत असल्याचे सांगितले आहे.
(रावणफोंड, मडगाव परिसरात लावण्यात आलेला फलक)