आगोंद येथील १२ शॅक्सना टाळे

प्रदूषण नियंत्रण मंडळाचा परवाना नसल्यामुळे उपजिल्हाधिकाऱ्यांची कारवाई


16 hours ago
आगोंद येथील १२ शॅक्सना टाळे

उपजिल्हाधिकारी मधू नार्वेकर व मामलेदार मनोज कोरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली आगोंद येथील शॅक्सना टाळे ठोकताना कामगार. (संजय कोमरपंत)
प्रतिनिधी। गोवन वार्ता
काणकोण : उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, आगोंद किनाऱ्यावर असलेल्या १७ शॅक्सवर मंगळवारी टाळे ठोकण्याची कारवाई करण्यात आली. १७ पैकी ५ शॅक्सधारकांनी आपले शॅक्स कारवाईपूर्वीच हटवले. उर्वरित १२ शॅक्सना टाळे ठोकण्यात आले. किनाऱ्यावरील १७ शॅक्सनी प्रदूषण नियंत्रण मंडळाचा दाखला घेतला नव्हता. उच्च न्यायालयाने प्रदूषण नियंत्रण मंडळाचा परवाना घेतला नसताना व्यवसाय करत असल्याचा ठपका ठेवून सर्व शॅक्सना टाळे ठोकण्याचे आदेश दिले होते.
उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार मंगळवारी काणकोणचे उपजिल्हाधिकारी मधू नार्वेकर यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. यावेळी मामलेदार मनोज कोरगावकर, गटविकास अधिकारी सावियो कार्वालो, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अभियंते राजमोहन प्रभुदेसाई, आगोंदचे पंचायत सचिव अमोल नाईक गावकर उपस्थित होते. वीज खात्याचे अभियंते च्यारी यांनी सदर शॅक्सच्या वीजजोडण्या तोडल्या. इतर खात्याच्या कर्मचाऱ्यांनी शॅक्सच्या दरवाजांना कुलूप लावून टाळे ठोकले. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.            

हेही वाचा