जलशक्ती मंत्रालयाची माहिती : पाणी रसायनमुक्त
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : गोव्यातील जमिनीखालील पाणी (भूजल) स्वच्छ आहे. त्यात रासायनिक भेसळ नाही. भूजलाची गुणवत्ता ठरवण्यासाठी २६ नमुने घेण्यात आले. त्यांची चाचणी केल्यानंतर भूजलाचा दर्जा चांगला आणि रसायन भेसळमुक्त असल्याचे स्पष्ट झाले. भेसळमुक्त भूजल असलेले गोवा हे देशातील तीन राज्यांतील एक ठरले आहे. मिझोरम आणि नागलँड यांचेही भूजल रसायनमुक्त आहे, अशी माहिती केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी एका लेखी उत्तरातून दिली आहे.
राज्यसभेच्या पटलावर केंद्रीय जलशक्ती मंत्री शेखावत यांनी वार्षिक भूजल दर्जा अहवाल सादर केला. केंद्रीय भूजल मंडळाने २०२३ मध्ये या अहवालाचे काम हाती घेतले होते. डिसेंबर २०२४ मध्ये अंतिम अहवाल तयार केला. या अहवालात देशभरातील १५,२५९ स्थानांवरून भूजलाचे सॅम्पल घेऊन त्यांचे विश्लेषण केले आहे. पिण्यासाठी आणि शेतीसाठी वापरात येणाऱ्या भूजलात विद्युत वाहकता, फ्लुरोईड, आर्सेनिक, जड धातू, नायट्रेट यांसारख्या घटकांचे प्रमाण तपासले गेले.
गोव्यातील भूजलात नायट्रेट, फ्लुरोईड, आर्सेनिक आणि युरेनियम यांसारख्या रासायनिक पदार्थांची भेसळ नाही, हे अहवालात नमूद केले आहे. नायट्रेट तपासणीसाठी १० नुमने घेण्यात आले होते. फ्लुरोईड तपासणीसाठी १०, युरेनियम तपासणीसाठी ६ सॅम्पल्स घेतले होते. कशातही भेसळ आढळली नाही. आर्सेनिक तपासणीसाठी मात्र एकही नमुना घेतलेला नाही.
चाचणीसाठी सॅम्पल्समध्ये क्लोराईडची तपासणी करण्यात आली. क्लोराईड हा रासायनिक घटक घाण आणि मैलामिश्रित (सेप्टीक) पाणी सोडल्यामुळे उद्भवतो. गोव्याच्या भूजलमध्ये क्लोराईडचे प्रमाण मर्यादेत आढळले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे गोवा समुद्रकिनारी वसलेला असूनही भूजलात सोडियमचे प्रमाण कमी आढळले. सोडियमचे प्रमाण जास्त असेल, तर त्याचा झाडांच्या वाढीवर प्रतिकुल परिणाम होतो. जमिनीची पाणी झिरपण्याची क्षमता कमी होते. पिकांचे उत्पादनही घटते.
एका वर्षात भूजल वापरात मोठी वाढ
मागील एका वर्षात राज्यातील भूजल वापरात ३० लाख घनमीटरने वाढ झाली आहे. घरगुती, औद्योगिक आणि शेती क्षेत्रासाठी एका वर्षात भूजलाचा वापर वाढला आहे. २०२३ मध्ये राज्यात ६.८ कोटी घनमीटर भूजल वापरले. २०२४ च्या अखेरपर्यंत ७.१ कोटी घनमीटर भूजल वापरले गेले. वापर वाढला असला तरी भूजल साठा सुरक्षित आहे.