आदिवासी व्यक्तीचा छळ; शेजाऱ्यांवर गुन्हा नोंदवा !

पोलीस अधीक्षकांना सूचना : अनुसूचित जाती आणि जमाती आयोगाची शिफारस


16 hours ago
आदिवासी व्यक्तीचा छळ; शेजाऱ्यांवर गुन्हा नोंदवा !

प्रतिनिधी । गोवन वार्ता
पणजी : आदिवासी समाजाच्या व्यक्तीला त्रास देण्यासाठी खोटी तक्रार दाखल करून छळ केला. या प्रकरणी अनुसूचित जाती आणि जमाती आयोगाने शेजाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची शिफारस पोलीस अधीक्षकांना केली आहे. याबाबतची शिफारस आयोगाचे अध्यक्ष दीपक करमलकर यांनी केली आहे.                         

या प्रकरणी आयोगाकडे २८ नोव्हेंबर २०१८ रोजी अर्ज दाखल झाला होता. त्यानुसार, अर्जदार व्यक्तीने घराशेजारी राहणाऱ्या पाच व्यक्तींच्या विरोधात आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. वरील शेजाऱ्यांनी १० ऑगस्ट २०१८ रोजी आजोशी-मंडूर सरपंचाकडे भिंतीसाठी परवानगी मागितली होती. त्यांनी अर्जदार परिसरात सांडपाणी सोडत असल्याची तक्रारही केली होती. सांडपाणी साचल्यामुळे दुर्गंधी पसरते आणि डासांची पैदास होते, असेही तक्रारीत म्हटले होते. 

या प्रकरणी पंचायतीने काहीच न केल्यामुळे शेजाऱ्यांनी २८ ऑगस्ट २०१८ रोजी बेतकी आरोग्य केंद्रात तक्रार दाखल केली. परिसर अधिकार क्षेत्रात येत नसल्यामुळे बेतकी केंद्राने खोर्ली आरोग्य केंद्राकडे सदर तक्रार पाठवून दिली. खोर्ली आरोग्य केंद्रातर्फे वैद्यकीय अधिकारी आणि स्वच्छता निरीक्षकांनी १७ सप्टेंबर २०१८ रोजी परिसराची पाहणी केली. त्यावेळी परिसर कोरडा होता. तसा अहवाल त्यांनी दिला. अर्जदार व्यक्तीने प्रतिवादींविरोधात आयोगाकडे तक्रार केली. आपल्याविरोधात खोटी तक्रार करून प्रतिवादी आपला छळ करत असल्याचा दावा त्यांनी केला.

त्रास देण्यासाठी खोटी तक्रार दाखल केल्याचे निरीक्षण

१ आयोगाने दोन्ही पक्षांना त्यांची बाजू मांडण्यास संधी दिली. प्रतिवादींनी आयोगाकडे त्यांच्या तक्रारीबाबत काही फोटो सादर केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तक्रार दाखल केल्यानंतर १९ दिवसांनी पाहणी केल्याचा दावा केला. आयोगाने दोन्ही बाजू एेकून संबंधित फोटो पाऊस असताना घेतल्याचे निरीक्षण नोंदवले. 

२ आदिवासी समाजाच्या व्यक्तीला त्रास देण्यासाठी खोटी तक्रार दाखल करून छळ करण्यात आल्याचे निरीक्षणही आयोगाने नोंदवले. आयोगाने प्रतिवादींविरोधात अनुसूचित जाती आणि जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची शिफारस केली.