मराठी, कोकणी सक्तीची करण्याचा आमदार मायकल लोबोंचा सरकारला सल्ला
म्हापसा : भाऊसाहेब बांदोडकर यांनी सुरू केलेल्या शाळा टिकवायच्या असतील तर प्राथमिक शिक्षणाचे माध्यम इंग्रजी करणे गरजेचे आहे. तसेच शाळांमध्ये कोकणी आणि मराठीची सक्तीही करणे आवश्यक आहे. प्राथमिक शाळा वाचवायचा असतील तर यामध्ये कुणीही राजकारण करू नये, असे मत आमदार मायकल लोबो यांनी व्यक्त केले. भाऊसाहेब बांदोडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रमावेळी ते बोलते होते.
आज चांगल्या प्रकारच्या इंग्लिश मीडियम शाळा कार्यरत आहेत. त्यामुळे साहजिकच पालकांचा आपल्या मुलांसाठीचा शिक्षणाचा ओढा हा या शाळांकडे आहे. मात्र त्यामुळे प्राथमिक शाळा बंद होण्याच्या अवस्थेत असून सरकारने या शाळा एनजीओंना देण्याचे ठरवले आहे. सरकारकडे ३३ आमदार आहेत, त्यामुळे प्राथमिक शाळा वाचवण्याबाबत सरकारने योग्य तो निर्णय घ्यावा, आम्हा सर्वांचा त्या निर्णायाला पूर्ण पाठिंबा असेल., असे लोबो म्हणाले.
लाखोंचा खर्च करूनही प्राथमिक शाळा बंद होणे दुर्दैवी :
या प्राथमिक शाळांच्या शिक्षकांचा पगार, शाळांमधील सोयीसुविधा, डागडुजी या कारणासाठी सरकार दरवर्षी लाखो रुपये खर्च करते. मात्र एवढे करूनही या शाळा १-२ वर्षात बंद होतात, हा प्रकार दुःखदायक आहे. भाषावाद वेगळा आहे. तो शिक्षणाच्या आड येता नये. मात्र प्राथमिक शाळा वाचवायचा असतील तर प्राथमिक शिक्षणाचे माध्यम इंग्रजी करणे गरजेचे असल्याचे आमदार लोबो म्हणाले.