विदेशात नोकरीच्या बहाण्याने गोव्यातील एका युवकाची फसवणूक

सदर युवकाची सुटका: आज गोव्यात आणणार

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
11th March, 05:21 pm
विदेशात नोकरीच्या बहाण्याने गोव्यातील एका युवकाची फसवणूक

पणजी : परदेशी नोकरी घोटाळ्यात अडकलेल्या एका गोव्यातील तरुणाची नुकतीच सुटका करण्यात आले असून, त्याला सायबर पोलिसांची टीम मंगळवारी रात्री गोव्यात परत घेऊन येत असल्याची माहिती मिळाली आहे. 

या घटनेची पार्श्वभूमी अशी की,  जानेवारी २०२५ मध्ये, गोव्यातील एका अभियांत्रिकी पदवीधर युवकाला थायलंडमधील कॉल सेंटरमध्ये नोकरीसाठी सोशल मिडीयावर भरतीची जाहिरात दिसली. त्या नोकरीच्या ऑफरमध्ये मोफत निवास, जेवण आणि ₹६०,००० मासिक पगार अशी माहिती समाविष्ट होती. 

ही भरती प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन करण्यात आली होती. संबंधित व्यक्तीसोबत एजंट थेट संवाद न साधता व्हॉट्सअॅपद्वारे संपर्क साधत होता. एजंटने सदर युवकाला बँकॉकला जाण्यासाठी त्याच्या फ्लाइटचे बुकिंग देखील केले होते.

१४ जानेवारी २०२५ रोजी सदर युवक व्हिसावर थायलंडमध्ये गेल्यानंतर, त्याला सुरुवातीला एका रिसॉर्टमध्ये ठेवण्यात आले होते. दुसऱ्या दिवशी, त्याला म्यानमारमध्ये नेण्यात आले. म्यानमारमध्ये पोहोचल्यानंतर, त्याला कडक पहाऱ्यात ठेवण्यात आले होते. त्याला दररोज १४ तास काम करावे लागत होते. तसेच एका परदेशी नागरिकाच्या नेतृत्वाखालील नागरिकांना, फसव्या जाहीराती वापरून हनी ट्रॅपिंग पद्धतींमध्ये सहभागी करण्याचे काम देण्यात आले होते. 

नागरिकांनी सतर्क राहावे

भारत सरकारने जारी केलेल्या प्रेस रिलीजमध्ये अधोरेखित केल्याप्रमाणे, सदर युवकासहित इतर काही व्यक्तींना अलिकडेच वाचवण्यात आले असून परदेशातील नोकऱ्यांसाठी फक्त MEA नोंदणीकृत एजंट्सद्वारे अर्ज करावा, असे सांगण्यात आले आहे. तसेच नागरिकांनी सतर्क राहावे आणि संशयित एजंटची तक्रार सायबर पोलीस  किंवा स्थानिक पोलीस स्टेशनला करावी. तसेच नागरिक १९३० हेल्पलाइन किंवा Cybercrime.gov.in वेबसाइटद्वारे तक्रार करू शकतात, असे देखील सांगण्यात आले आहे.

हेही वाचा