केंद्रीय अर्थ राज्यमंत्र्याने दिली राज्यसभेत माहिती
पणजी : केंद्र सरकारने गोव्यातून ४ हजार ६३५ कोटी रुपये कॉर्पोरेट कर गोळा केला आहे. ही आकडेवारी आर्थिक वर्ष २०२२-२३ ते २०२४-२५ (२८ फेब्रुवारी अखेरीस) या कालावधीतील आहे. या कालावधीत संपूर्ण देशातून ३१.३० लाख कोटी कार्पोरेट टॅक्स जमा झाला आहे. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी राज्यसभेत दिलेल्या लेखी उत्तरातून ही माहिती मिळाली आहे. याबाबत खासदार रजनी पाटील यांनी याविषयी अतारांकित प्रश्न विचारला होता.
उत्तरात दिलेल्या माहितीनुसार, गोव्याचा विचार करता आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये केंद्राने १४१३.०९ कोटी रुपये कॉर्पोरेट कर संकलित केला होता. पुढील आर्थिक वर्षात त्यामध्ये २६४.५४ कोटी रुपयांची वाढ झाली. २०२३-२४ मध्ये गोव्यातून १६६७.६३ कोटी रुपये कॉर्पोरेट कर गोळा झाला. आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये (२८ फेब्रुवारी अखेरीस) गोव्यातून १५५४.९६ कोटी रुपये कॉर्पोरेट कर संकलित झाला आहे.
घटनेच्या कलम २८० (३) नुसार केंद्राने जमा केलेल्या करातील काही वाटा राज्य सरकारांना द्यावा लागतो. याबाबत वित्त आयोग वेळोवेळी शिफारस करत असते. १५ व्या वित्त आयोगानुसार राज्य सरकार केंद्राने जमा केलेल्या पैकी ४१ टक्के करांचा वाटा परत घेण्यास पात्र आहेत. या केंद्रीय करांमध्ये कॉर्पोरेट करांचाही समावेश असतो. केंद्र सरकार जमा झालेला कर राज्यांना विविध निकषांवर देत असते. यामध्ये राज्याची लोकसंख्या, दरडोई उत्पन्न, वन आणि पर्यावरण अशा विविध गोष्टींचा समावेश असल्याचे उत्तरात म्हटले आहे.
महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक कर जमा
राज्यांचा विचार करता या कालावधीत महाराष्ट्रातून सर्वाधिक १३.४४ लाख कोटी कॉर्पोरेट कर जमा झाला आहे. यानंतर कर्नाटक मधून ३.२८ लाख कोटी, तामिळनाडूतील १.९० लाख कोटी, गुजरातमधून १.४३ लाख कोटी, तेलंगणामधून १.२२ लाख कोटी रुपये कॉर्पोरेट कर जमा झाला आहे. या दरम्यान त्रिपुरातून सर्वात कमी म्हणजे १५९ कोटी रुपये कॉर्पोरेट कर जमा झाला आहे. केंद्र शासित प्रदेशात दिल्ली येथून सर्वाधिक ३.९१ लाख कोटी कॉर्पोरेट कर जमा झाला आहे. तर लडाखमधून १.७० कोटी रुपये कॉर्पोरेट कर जमा झाला.