आरोग्य खात्याचा टाटा मेमोरीयल व ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या सहकार्याने उपक्रम
पणजी : कॅन्सर, किडणी, डायबेटीस तसेच इतर दुर्धर आजारांबाबत (एनसीडी) अभ्यास व संशोधनासंबंधीच्या लाँजीट्युडीनल कोहोर्ट स्टडी उपक्रमाचा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंंत यांच्या हस्ते शुभारंभ झाला. कॅन्सर, किडणी, डायबेटीस या आजारांचे प्रमाण, त्याची कारणे याबाबतही माहिती अभ्यासानंतर उपलब्ध होणार आहे.
संशोधनामुळे आरोग्याचे धोरण आखण्यासह निधीची तरतूद करणे शक्य होणार आहे. या संशोधनासाठी अर्थसंकल्पात आर्थिक तरतूद करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.
टाटा मेमोरीयल हॉस्पिटल व ऑक्सफर्ड विद्यापीठ यांच्या साहाय्याने आरोग्य खाते हे संशोधन करणार आहे. पर्वरी मंत्रालयात उपक्रमाचा शुभारंभ करण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी आरोग्य खाते, टाटा मेमोरीयल हॉस्पिटल व ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांशी बैठक घेतली.
मुख्य सचिव व्ही. कांडावेलू ,आरोग्य खात्याच्या संचालक डॉ. रुपा नाईक, गोवा वैद्यकीय महाविद्यालय हॉस्पिटलाचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर, डॉ. शेखर साळकर, व इतर अधिकारी बैठकीला उपस्थित होते.
गोव्यात कॅन्सर, डायबेटीस (मधुमेह) तसेच इतर आजारांचे प्रमाण वाढत आहे. हे आजार होण्यामागची कारणे कोणती आहेत? आजाराचे नेमके प्रमाण किती आहे? प्रमाण कमी करण्यासाठी उपाय कोणते? यावर अभ्यास होण्याची गरज आहे. यामुळे आरोग्यविषयक आकडेवारी व अचूक माहिती उपलब्ध होणार आहे. लॉजीट्युडीनल कोहोर्ट स्टडी उपक्रमाअंतर्गत अभ्यास तसेच संशोधन होणार आहे.
यामुळे उपचार तसेच प्रतिबंदात्मक उपाय योजना करणे शक्य होणार आहे. गोव्यातील प्रत्येक नागरिकाला आरोग्यविषयक सर्वोत्कृष्ट सेवा देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. यासाठी साधन सुविधा तयार करण्यासह कुशल मनुष्यबळ उपलब्ध करण्याची गरज आहे. या सर्व गोष्टींसाठी हा उपक्रम पूरक ठरणार असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले.
कोहोर्ट स्टडी हा गोवा केरस २०२५ अंतर्गत सुरू होणारा उपक्रम आहे. वाळपई, साखळी, मडगाव, काणकोण तसेच किनारपट्टी भागातील जनतेचे रक्ताचे नमुने घेतले जाईल. रक्ताचे नमुने घेण्याबरोबर वजन तसेच इतर आवश्यक घटकांची तपासणी केली जाईल.
हे नमुने टाटा मेमोरीयल हॉस्पिटल, मुंबईला पाठविण्यात येतील. रक्ताचे नमुने व इतर तपशीलाच्या आधारे अभ्यास केला जाईल, अशी माहिती डॉ. शेखर साळकर यांनी दिली.
कॅन्सर, डायबेटीस, हायपरटेंशन हे आजार एकाच कुटुंबातील बऱ्याच जणांना झाल्याची उदाहरणे आहेत. याची कारणे आनुवंशिक आहेत की जीवन पद्धतीशी संबंधित आहेत, याचा अभ्यास होण्याची गरज आहे. या उपक्रमामुळे हा अभ्यास होणार असल्याचे आरोग्य खात्याचे संचालक डॉ. रूपा नाईक यांनी सांगितले.
आजाराची माहिती डिजीटल स्वरूपात मिळणार
या उपक्रमाचा आता गोव्यात शुभारंभ झाला असला, तरी संपूर्ण भारतात संशोधन होणार आहे. यामुळे आजाराची कारणे, प्रमाण याबाबतची माहिती डिजीटल स्वरूपात तयार होणार असल्याचे डॉ. राजेश दिक्षीत म्हणाले. याप्रसंगी गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर व मुख्य सचिव व्ही. कांडावेलू यांचीही भाषणे झाली.